
आदिवासी पाडा कोळेवाडी येथे द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल आनंदोत्सव
आंबेगाव - भारत देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए च्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार असल्याच्या आनंदाने पुणे शहरालगत आणि पुणे महापालिकेच्या नवीन हद्दीतील समाविष्ट झालेल्या आदिवासी पाडा कोळेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक ढोल ताशा वाद्य वाजवून,फटाके वाजवून,एकमेकांना पेढे भरवून, गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.या आनंदोत्सवात महिलांची संख्या लक्षणीय होती.
मूलनिवासी असलेल्या आदिवासी समाजात अजूनही शिक्षणाची तितकी गोडी लागलेली नाही. शिक्षणाची फळं चाखेल तोच या जगात टिकेल. आज आदिवासी समाज खऱ्या अर्थाने समाजाच्या मुख्य प्रवाहात येतो आहे. सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल आणि आता देशाचे राजकारण असेल. या समाजाच्या मानबिंदू असलेल्या ठिकाणी आदिवासी युवक-युवती, महिला-पुरुष आपल्या ज्ञानाच्या आणी शिक्षणाच्या जोरावर विविध क्षेत्रात पाऊल पुढे टाकत आहेत.
द्रौपदी मुर्मू यांची होणारी राष्ट्रपतीची निवड हीच आपल्या सर्व आदिवासी बांधवांची ऊर्जा आहे, असे भावनिक प्रतिपादन कोळेवाडीचे माजी सरपंच दिलीप शेलार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समितीच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी सागर सांगळे, दामोदर शेलार, रघुनाथ चोरघे, अतुल शेलार, सुरेश धानवले, छाया पढेर,माजी ग्रामपंचायत सदस्या रंजना चोरघे यांचेसह आदिवासी पाडा कोळेवाडी युवक समितीचे सर्व सदस्य व नागरीक उपस्थित होते.
कोळेवाडी ग्रामस्थ लवकरच दिल्लीवारीला !
श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदी निवड झाल्यानंतर आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समितीकडून इ मेल द्वारे शुभेच्छा संदेश दिला आहे. तर गावातील असणाऱ्या विविध समस्या राष्ट्रपती दरबारी मांडण्यासाठी लवकरच कोळेवाडीचे ग्रामस्थ राजधानी दिल्लीला जाणार असल्याची माहिती आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समितीचे उपाध्यक्ष दामोदर शेलार यांनी सकाळशी बोलताना दिली.
'आज आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती पदी आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थ महिलांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या. आदिवासी महिलाही आता राजकारणात सक्रिय झाल्या आहेत.आम्हाला अतिशय आनंद झाला आहे.
- छाया पढेर, गृहिणी कोळेवाडी.
'देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या चर्चा जगभरात सुरु होती. या पदावर द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याने देशातील एकत्मता आज जगाला दिसून आली आहे. राष्ट्रपतींच्या शपथ विधी नंतर लवकरच आम्ही राष्ट्रपतीना भेटणार आहोत.
- सागर सांगळे, अध्यक्ष आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समिती.
'कोळेवाडी पाड्यावर उत्साहाच वातावरण पाहुन आनंद झाला. आमच्यातला एक देशाचे प्रतिनिधित्व करणार ही खुप मोठी बाब आहे.राजकारणापासून कोसोदूर असलेल्या आमच्या पाड्यातील जेष्ठ नागरिकही आनंदोत्सवात सहभागी झाले.
- दामोदर शेलार, उपाध्यक्ष आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समिती.
Web Title: Celebrations For Election Of Draupadi Murmu As President At Tribal Pada Kolewadi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..