esakal | पुण्यात लशींअभावी आज केंद्र बंद

बोलून बातमी शोधा

vaccine
पुण्यात लशींअभावी आज केंद्र बंद
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात मंगळवारी १३ हजार ३९९ जणांना लस देण्यात आली. शासनाकडून महापालिकेला मिळालेल्या ३८ हजार लशींपैकी बहुतांश लस संपल्या आहेत. अनेक केंद्रांवर आज एकही लस शिल्लक नसल्याने ज्येष्ठ नागरिकांसह इतरांनी लस घेण्यासाठी बुधवारी (ता. २८) केंद्रावर न गेलेलेच बरे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लस उपलब्ध झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू असून, आत्तापर्यंत आठ लाख ८ हजार ४८४ जणांचे लसीकरण झालेले आहे. रविवारी शासनाकडून ३८ हजार डोस उपलब्ध झाले. सोमवारी २४ हजार ७०२ जणांचे लसीकरण झाले, तर मंगळवारी १३ हजार ३९९ जणांना लस दिली. त्यामुळे हा साठा जवळपास संपला आहे.

हेही वाचा: कोरोना रुग्णांचे होणार आता ऑडिट; महापालिकेचा निर्णय

मागणीपेक्षा कमी लस मिळत असल्याने लसीकरण केंद्रांवर केवळ ५० ते १०० जणांचे लसीकरण होत आहे. महापालिकेच्या अनेक केंद्रांवरील लस सोमवारीच संपल्याने मंगळवारी अनेक केंद्रांना टाळेच होते. तसेच काही ठिकाणी नागरिक दोन-तीन तास रांगेत थांबूनही लस उपलब्ध झाली नसल्याने घरी परतावे लागले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले, ‘‘शासनाकडून ज्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे, तशी सर्व केंद्रांवर दिली जात आहे. रात्री उशिरापर्यंत लस उपलब्ध झाली नाही तर ‘लस संपल्याने केंद्र बंद आहे’, असे बोर्ड लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नगरसेविका मंजूषा नागपुरे म्हणाल्या, ‘‘आरोग्य विभागाने लस उपलब्ध होणार आहे की नाही, हे आदल्या दिवशी स्पष्ट करणे गरजेचे आहे. याची माहिती कोणालाही नसल्याने सिंहगड रस्ता भागातील केंद्रांवर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामधूनच संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यात वेळीच सुधारणा करावी.’’

हेही वाचा: करा दान; पण हवे भान! जास्त रक्त संकलित केल्यास वाया जाण्याची शक्यता

आजपासून नोंदणी सुरू

केंद्र सरकारने १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांना १ मे पासून लस देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, अशांनाच लस दिली जाणार आहे. ही नोंदणी कोवीन ॲपवर करणे गरजेचे असून त्यांची नोंदणी २८ एप्रिलपासून सुरू होत आहे.

मंगळवारी झालेले लसीकरण

गट - पहिला डोसा - दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी -१०४ - ३५२

फ्रंटलाइन कर्मचारी - ८५० - ४३८

ज्येष्ठ नागरिक - १३६७ - ५३२२

४५ ते ५९ वयोगट - ३२३६ - १७३०

हेही वाचा: बेडची माहिती न देणाऱ्या रुग्णालयांवरही कारवाई