भ्रष्टाचाराचाच 'कौशल्य विकास' (व्हिडिओ)

ज्ञानेश्‍वर रायते
रविवार, 23 डिसेंबर 2018

परीक्षा न देताच विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण; अनुदान लाटण्याचे प्रकार

परीक्षा न देताच विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण; अनुदान लाटण्याचे प्रकार

भवानीनगर (पुणे): येथे केंद्र सरकारच्या अनुदानित योजनेतून बॅंकिंग प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या 30 जणांनी सन 2017 मध्ये प्रशिक्षण तर घेतले, मात्र ऐन परीक्षेवेळी, "तुमचा प्रवेश रिजेक्‍ट झाला,' असा निरोप भिगवण (ता. इंदापूर) येथील परीक्षा घेणाऱ्या संस्थेने दिला. परीक्षाच होणार नसल्याने विद्यार्थ्यांनी नाद सोडला; पण आश्‍चर्य असे की, परीक्षा न देताच हे विद्यार्थी उत्तम गुणाने उत्तीर्ण झाले आहेत...एवढेच नाही, तर सरकारच्या लेखी ते नोकरीही करू लागले आहेत...केंद्र व राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून आणलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेच्या विविध योजनांची खालच्या स्तरावर मात्र पुरती वाट लावण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत...एकंदरीतच अनुदान लाटण्यासाठी हा भ्रष्टाचाराचाच कौशल्य विकास सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजनांना केंद्र सरकार व राज्य सरकार संयुक्तपणे अनुदान देते. महाराष्ट्रातील हे कौशल्य विकास प्रशिक्षणाचे कार्यक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास योजनेतून (एमएसएसडीएस) चालविले जातात. याकरिता दिले जाणारे अनुदान भरभक्कम आहे.

बॅंकिंग क्षेत्रातील कोर्सेस करणाऱ्यांना केंद्र व राज्य सरकार पाचशे तासांसाठी प्रतितास 30.25 रुपये अनुदान असून, ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील कोर्सेससाठी सातशे तासांकरिता प्रतितास 46 रुपये अनुदान दिले जाते. बॅंकिंग, ऑटोमोटिव्हच नव्हे, तर फॅशन डिझायनिंगपासून ब्युटी पार्लर, मशीनकाम अशा अनेक योजनांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये सरकारने ही योजना सुरू करताना मोफत ही कौशल्ये देऊन त्या युवक, युवती, बेरोजगारांना नोकरीपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारचा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे, मात्र तो प्रयत्न साकारणाऱ्यांनी त्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. यामध्ये या योजनेची मान्यता असणाऱ्या केंद्राने असेच प्रशिक्षण देणाऱ्या इतर संस्थांशी करार करून अनुदानाच्या 45 टक्के रक्कम देण्याचे करारही केले आहेत. सरकारी योजनेचे मातेरे करण्याचा हा प्रयत्न अतिशय गंभीर आहे.

खेड तालुक्‍यामध्ये काही दिवसांपूर्वी असाच प्रकार उघडकीस आला. त्यानंतर इंदापूर तालुक्‍यातही तो उघडकीस आला आहे. इंदापूर तालुक्‍यातील भवानीनगर येथील 30 जणांनी सन 2017 मध्ये डिसेंबर महिन्यात बॅंकिंग क्षेत्रातील माहितीसाठी टॅली हा कोर्स निवडला. त्याकरिता भवानीनगर येथील "लिंक कॉम्प्युटर' या संगणक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला. हा प्रवेश घेऊन त्याचे प्रशिक्षणही पूर्ण केले. दरम्यानच्या कालावधीत त्या विद्यार्थ्यांची बॅच भिगवण येथील विठ्ठलराव थोरात इन्स्टिट्यूट या खासगी संस्थेशी जोडली होती. ही संस्था त्यांची अंतिम परीक्षा घेणार होती. त्यानुसार सर्व प्रक्रिया झाली. मात्र, प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी भिगवणच्या संस्थाचालकांनी, "तुमचे विद्यार्थी रिजेक्‍ट झाले,' असा निरोप दिला. रिजेक्‍ट झाल्याने विद्यार्थी निराश झाले. मध्यंतरी बराच काळ गेला. मात्र, अचानक 16 जानेवारी 2018 रोजी त्यांची उत्तीर्णतेची प्रमाणपत्रे उपलब्ध झाली. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. याच्या खोलात जाऊन पाहिल्यानंतर या विद्यार्थ्यांचे सर्व अनुदान भिगवणच्या संबंधित संस्थेला मिळाल्याचेही दिसून आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांऐवजी दुसरेच कोणीतरी त्यांची परीक्षा दिली, असेच उघडकीस आले. विद्यार्थ्यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला आहे. यामध्ये अजूनही फार मोठी साखळी कार्यरत असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, यासंदर्भात "एमएसएसडीएस'च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

नोकरीला लागल्याचेही अनुदान
फक्त प्रशिक्षणापुरता हा विषय नाही. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या उमेदवारास नोकरी लागली असेल, तर त्याचेही वेगळे अनुदान मिळते. म्हणून छोट्या छोट्या आस्थापनांमध्ये नोकऱ्या लागल्याचे बोगस दाखविले जात आहे. भवानीनगरमधील 30 जणांपैकी काही जणांना नोकऱ्या लागल्याचे दाखविले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे असे उमेदवार एकतर महाविद्यालयात शिकत आहेत किंवा त्यांना खरोखरच काम नाही. मात्र, सरकारच्या लेखी ते नोकरी करीत आहेत. त्यामुळे आम्ही एवढा रोजगार दिला, असे सांगत सरकारी आकडे उभे राहू लागले आहेत.

अनुदान
बॅंकिंग प्रशिक्षण ः प्रतितास 30 रुपये. एकूण 500 तासांकरिता ः 15 हजार रुपये. (विद्यार्थ्याला केवळ 800 रुपये भरावे लागतात.)
ऑटोमोटिव्ह प्रशिक्षण ः प्रतितास 46 रुपये. एकूण 700 तासांकरिता ः 32 हजारापर्यंत हे अनुदान मिळते. (विद्यार्थ्याला यासाठीही केवळ 800 ते 1 हजार भरावे लागतात.)

आमच्या केंद्राशी भिगवणच्या संस्थेने 45 टक्के अनुदानातील रक्कम देण्याबाबतचा लेखी करार केला होता. आम्ही विद्यार्थी जोडले. रीतसर प्रशिक्षणही दिले. मात्र, फोटो न दिल्याच्या कारणावरून विद्यार्थी रिजेक्‍ट झाल्याचा निरोप मिळाला. विद्यार्थी परीक्षेला गेलेच नाहीत. मात्र चार दिवसांपूर्वी हे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे समजले. आम्ही तर कपाळालाच हात लावून घेतला. यात विद्यार्थी व आमच्या संस्थेचीही फसवणूक झाली आहे.
- जैनुद्दीन कबीर, प्रशिक्षक, लिंक कॉम्प्युटर संस्था, भवानीनगर (ता. इंदापूर)

भवानीनगरमधील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला व त्यांची बायोमेट्रिक हजेरीही झाली, हे खरे आहे; परंतु विद्यार्थी परीक्षा देण्यास आले नाहीत. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा करून घेतली. असे करणेही चूक आहे, हे मान्यच आहे; परंतु त्याला आमचा नाईलाज होता. विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे स्वतः त्यांनी परीक्षा न देता आली आहेत, हे त्यांचे म्हणणे खरे आहे.
- बापूराव थोरात, अध्यक्ष, विठ्ठलराव थोरात इन्स्टिट्यूट, भिगवण (ता. इंदापूर)

Web Title: central government funding schemes corruption at indapur