मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

राज्यातील चक्रवाती स्थिती सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रातून पुढे ईशान्य अरबी समुद्राकडे सरकली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील पाऊस कमी होणार आहे. शनिवारी (ता. 21) मराठवाडा, विदर्भात हलका; तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे - राज्यातील चक्रवाती स्थिती सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रातून पुढे ईशान्य अरबी समुद्राकडे सरकली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील पाऊस कमी होणार आहे. शनिवारी (ता. 21) मराठवाडा, विदर्भात हलका; तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुढील दोन ते तीन दिवसानंतर राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र नागपूर, चंद्रपूर, परभणी, नांदेड, मुंबई, रत्नागिरी, अलिबाग या जिल्ह्यांत हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. मागील 24 तासांत परभणी आणि औरंगाबादमध्ये काही भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मागील 24 तासांत पडलेला पाऊस (मि. मी.) - कोकणातील चिपळूण 100, लांजा 90, मुंबई (कोलाबा), वाडा 80, दोडामार्ग, रामेश्वर कृषी 50, मध्य महाराष्ट्रातील अकोले 90, राहुरी 70, इगतपुरी 60, चाळीसगाव, चांदवड, करमाळा, शेवगाव, श्रीरामपूर 50, दहिवडी माण, मालेगाव, नेवासा, संगमनेर, सतना बागलाण 40, मराठवाड्यातील अर्धापूर 90, पैठण, पूर्णा 70, पाथरी 60, औरंगाबाद, गंगापूर, जाफराबाद, कंधार, लोहा, मानवत, परभणी 50. विदर्भातील लोणार 50, बुलडाणा 40, चिखली, खामगाव, लखनदूर, मेहकर, रिसोड, साकोली, तेल्हारा 30. घाटमाथा परिसरातील कोयना (नवजा), शिरोटा, ठाकूरवाडी, कोयना (पोफळी), लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस), शिरगाव, वळवण 10.

शहरात उघडीप
शहर आणि परिसरात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे; तर कमाल-किमान तापमान वाढणार असल्यामुळे शहरातील गारवा कमी होणार आहे. शुक्रवारी शहरातील मध्य भागासह उपनगरांत पावसाने उघडीप दिली. दिवसभर कडक ऊन पडले होते. शुक्रवारी शहरात 28.0 अंश कमाल आणि 22.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मागील 24 तासांत शहरात 5.1 मि. मी. पाऊस पडला आहे. शनिवारी शहर आणि उपनगरांत अधून-मधून जोरदार सरी बरसणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Maharashtra Rain Monsoon