
पुणे : देशातील विमान प्रवाशांची संख्या वाढतेय, विमानांची उड्डाणे वाढताहेत; मग आर्थिक मंदी कुठे आणि कशी आहे, असा प्रश्न केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी उपस्थित केला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
'पुणे इंटरनॅशनल सेंटर' आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित "आशिया आणि आंतरराष्ट्रीय उदयोन्मुख व्यापार प्रणाली' या संकल्पनेवर आयोजित "आशियायी आर्थिक संवाद' या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित होते.
बाळासाहेबांनी भाजपला पाठींबा दिला होता, पण... : शरद पवार
देशातील अर्थव्यवस्थेबाबत चुकीचे चित्र निर्माण केले जात असल्याची खंत व्यक्त करून पुरी म्हणाले, "देशात आर्थिक मंदी असल्याचे वारंवार बोलले जात आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था ही जगात पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असून, ती वेगाने वाढत आहे. 2.8 ट्रिलियन डॉलर क्षमतेची ही अर्थव्यवस्था 2024 मध्ये 5 ट्रिलियन डॉलर, तर 2030 मध्ये 10 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढेल. महागडी वाहने मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत, तर काही वाहनांची तांत्रिक कारणास्तव विक्री होत नाही.''
"प्रत्येक नागरिकाला 2022 पर्यंत पक्के घर देण्यासाठी केंद्राच्या प्रकल्प मान्यता व देखरेख समितीने नुकतीच एक कोटी घरे बांधण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. ही आकडेवारी आर्थिक मंदीची दिसत नाही,'' असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी थेट परकीय गुंतवणुकीची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. प्रशांत गिरबने यांनी सूत्रसंचालन केले. गौतम बंबावले यांनी आभार मानले.
महाराष्ट्र आर्थिक वाढीचा केंद्रबिंदू
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात राज्याचे मोठे योगदान असून, राज्य सरकार नवनवीन संकल्पना, व्यापार आणि आर्थिक वाढीला पोषक स्थैर्य आणि वातावरण पुरविण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे महाराष्ट्र हाच देशाच्या आर्थिक वाढीचा केंद्रबिंदू असून, केंद्र सरकार निश्चितपणे राज्य सरकारच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.