मदुराई एक्सप्रेसचा अपघात; मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचा मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

प्रवाशांची अवस्था लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गाडीतील सुमारे 1200 प्रवाशांना पोहे आणि चहाचे मोफत वाटप केले आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : मदुराई एक्सप्रेसचे काही डबे लोणावळ्याजवळ मंकी हिल येथे पहाटे पावणे तीनच्या सुमारास घसरले. त्यानंतर तब्बल साडेतीन तास प्रवासी गाडीत अडकले होते. घाटात पाऊसाची संततधार सुरुच असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

मदुराई एक्सप्रेसला अपघात झाल्याने पुणे - मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. ही गाडी सकाळी साडेसात वाजता पुणे स्टेशनवर पोहोचली. प्रवाशांची अवस्था लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गाडीतील सुमारे 1200 प्रवाशांना पोहे आणि चहाचे मोफत वाटप केले आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मदुराई एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांसाठी सोलापूर स्थानकावर दुपारच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 

पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी कृष्णाथ पाटील यांच्यासह अनेक अधिकारी पहाटे पावणे तीन वाजल्यापासून यासाठी प्रयत्नशील होते. मदुराई एक्सप्रेस पुण्यातून सकाळी 8 वाजता रवाना झाली.

Web Title: Central Railway helps Madurai Express Travellers