पुण्याच्या यशालीला प्रतिष्ठेची सीसीआरटी शिष्यवृत्ती

तबला वाद्यप्रकारासाठी पात्र ठरलेली राज्यातील एकमेव मुलगी
Yashali Kadam
Yashali Kadamsakal

पुणे : केंद्र सरकारच्या सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग (सीसीआरटी) या स्वायत्त विभागातर्फे बालकलाकारांना, म्हणजे १० ते १४ या वयोगटासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पुण्याच्या यशाली कदम हिची निवड झाली आहे. हिंदुस्थानी वाद्यांतील तबला या वाद्यप्रकारासाठी यशाली पात्र ठरली आहे. विशेष म्हणजे, तबला या वाद्यप्रकारासाठी यंदा निवड झालेल्या कलाकारांमध्ये यशाली महाराष्ट्रातील एकमेव मुलगी आहे.

‘सीसीआरटी’तर्फे नाटक, शास्त्रीय गायन-वादन, शिल्पकला, चित्रकला, लेखन आदी ललित कला क्षेत्रांतील बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील प्रतिभा विकसित करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीची २०२०-२१ साठीची यादी नुकतीच जाहीर झाली. यात देशभरातील ५६५ बालकलाकारांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील ४२ बालकलाकार या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यातील सात कलाकारांना तबला या वाद्यप्रकारासाठी शिष्यवृत्ती जाहीर झाली असून यशाली ही या यादीतील एकमेव मुलगी आहे. इतर मुलांमध्ये सार्थक गाडगे, प्रथमेश दाते, निहार जोशी, विहांग मुळे, मैत्रेय पारेख आणि आकाश कोरडे या मुलांचा समावेश आहे. देशभरातूनही केवळ दोनच मुलींना तबला वाद्यप्रकारासाठी शिष्यवृत्ती मिळाली असून त्यात यशालीसह पश्चिम बंगालच्या संचरी मालखंडी हिचा समावेश आहे.

यशाली सध्या अहिल्यादेवी हायस्कूल, पुणे या शाळेत इयत्ता नववीत शिकते आहे. सरगम संगीत विद्यालयात पं. अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे ती तबल्याचे शिक्षण घेत आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून ती तबल्याचे धडे गिरवते आहे. गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या तबल्याच्या चार परीक्षा ती उत्तीर्ण झाली आहे. ‘तबला वादनाच्या क्षेत्रात स्त्रियांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रात मला ठसा उमटवायचा आहे. त्यासाठी सध्या रोज मी दीड ते दोन तास रियाज करत असून पुढेही अजून मेहनत घेणार आहे’, असा मानस यशालीने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com