#IITStudents IIT पुणेकरांचे शतक

मीनाक्षी गुरव
रविवार, 2 डिसेंबर 2018

मुंबईमधील आयआयटीचे रॅंकिंग सर्वांत जास्त असते. त्याशिवाय येथील अध्यापन, प्लेसमेंट, पायाभूत सुविधा उत्तम आहेत. सुसंगत संस्कृती असल्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना या वातावरणात सामावून घेणे सहज शक्‍य होते. जवळपास 30 टक्के मराठी विद्यार्थी येथे आहेत. 

- आयुष डहाळे, आयआयटी मुंबई 

पुणे : देशातील 23 भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेश घेण्याची "क्रेझ' वाढत आहे. मात्र, दोन वर्षांपासून असणारे तिसऱ्या क्रमांकाचे स्थान राज्याने यंदाही कायम ठेवले आहे. 11 हजार 500 जागांमध्ये राज्यातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यात पुण्यातील 100 हून अधिक जणांचा सहभाग आहे. 

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशातील 23 आयआयटीजमध्ये प्रवेश घेण्यासाठी देशातील एक लाख 66 हजार विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज केला होता. अभियांत्रिकीतून आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. काही वर्षांपूर्वी आयआयटीमधील मराठी मुलांच्या प्रवेशाचा टक्का घसरला होता. मात्र, आता देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान टिकवून ठेवण्यात राज्याला यश आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

विदर्भातील काही विद्यार्थी जेईईच्या खासगी शिकवणीसाठी नागपूरमध्ये न जाता हैदराबादला जातात, तर मराठवाड्यातील काही विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे जातात. राज्यात खासगी शिकवणी लावून आयआयटीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाचशेच्या आसपास आहे. यात हैदराबाद, कोटा येथे शिकवणी करून आयआयटीमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, सोलापूर येथील काही विद्यार्थ्यांची भर पडते, असे आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी नमूद केले. 

आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश मिळावा, अशी सुरवातीपासून इच्छा होती. या संस्थेतील शिक्षणाच्या पद्धती इतरांच्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तसेच, देश आणि विदेशांत या संस्थेचे रॅंकिंग अधिक आहे. त्यामुळे मला आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घ्यायचे होते. आता मी एन्व्हायर्न्मेंट सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी ऍण्ड इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत आहे. 

- मानसी घाडगे, आयआयटी मुंबई 

- देशातील आयआयटी ः 23 
- प्रवेशाच्या जागा ः 11 हजार 500 
- जेईई मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी ः 11 लाख 35 हजार 84 
- जेईई ऍडव्हान्ससाठी पात्र विद्यार्थी ः दोन लाख 31 हजार 24 
- जेईई ऍडव्हान्ससाठी अर्ज केलेले ः एक लाख 66 हजार 
- आयआयटी प्रवेशासाठी पात्र ः 18 हजार 138 विद्यार्थी 
-------------------------------- 
राज्यातील प्रवेश (अंदाजे संख्या) 
- मुंबई ः 250 
- पुणे ः 100 
- नागपूर ः 100 
- औरंगाबाद ः 35 
------------------------------------ 
आयआयटी प्रवेशाची क्रमवारी 
- आंध्र प्रदेश 
- तेलंगण 
- राजस्थान 
- महाराष्ट्र 
- दिल्ली 
- उत्तर प्रदेश 
- बिहार 
----------------------------------- 
खासगी शिकवणीसाठी प्राधान्यक्रम 
- कोटा, दिल्ली, हैदराबाद, पुणे व मुंबई

"आयआयटी'मध्ये मराठी टक्का वाढण्यासाठी काय केले पाहिजे? आपले मत सुचवा... 
- फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम 

Web Title: Century in IIT Punekars Education News