Motivation News : ज्येष्ट नागरिकाचे वयाच्या पासष्टीत ट्रेकिंगचे शतक; ‘कात्रज-सिंहगड’चा पल्ला गाठला तब्बल १०० वेळा

डोंगर आणि दऱ्यांमधून जाणाऱ्या अरुंद व निसरड्या पाऊलवाटा तुडवत आणि झाडा-झुडपांचे अडथळे बाजूला सारत ट्रेकिंग पूर्ण करायचे म्हटले की, अनेकांच्या बाबतीत ते दिवास्वप्नच ठरतं.
Anil Sawant
Anil Sawantsakal

पुणे - डोंगर आणि दऱ्यांमधून जाणाऱ्या अरुंद व निसरड्या पाऊलवाटा तुडवत आणि झाडा-झुडपांचे अडथळे बाजूला सारत ट्रेकिंग पूर्ण करायचे म्हटले की, अनेकांच्या बाबतीत ते दिवास्वप्नच ठरतं. यामुळे भल्या-भल्यांच्या नाकीनऊ येतात. पण महत्वाकांक्षा ठेवत निश्‍चय केला की, अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात, हे पुण्यातील ज्येष्ट नागरिक अनिल सावंत यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

सावंत यांनी वयाच्या ६५ व्या कात्रज ते सिंहगड हा १६ किलोमीटर अंतराचा पल्ला तब्बल १७ डोंगर ओलांडत एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर, तब्बल १०० वेळा यशस्वीपणे गाठला आहे. यामुळे सावंत यांचे ‘कात्रज ते सिंहगड या ट्रेकिंगचे शतक पूर्ण झाले आहे.

कात्रजपासून सिंहगडपर्यंत जाण्यासाठी तब्बल १७ डोंगर ओलांडावे लागतात. या सर्व डोंगरांचे मिळून सुमारे १६ किलोमीटरचे अंतर. हा १६ किलोमीटर अंतराचा ट्रेक एकदा पूर्ण करतानाही अनेकांच्या नाकी नऊ येतात. मात्र, याला सावंत हे अपवाद ठरले आहेत. त्यामुळे कात्रज ते सिंहगड ट्रेकचे शतक पूर्ण करणारे सावंत हे ट्रेकिंगच्या वर्तुळात आता कात्रज ते सिंहगडचा राजा अशा नावाने ओळखले जाऊ लागले आहेत.

पुणे शहराच्या दक्षिणेच्या डोंगर रांगांतील चढ-उताराच्या अवघड, निसरड्या, काही ठिकाणी एकच व्यक्ती जाऊ शकेन, इतक्या चिंचोळ्या वाटा असलेला कात्रज-सिंहगड हा ट्रेक आहे. हा ट्रेक जेमतेम एकदा पूर्ण करण्यासाठीसुद्धा भल्याभल्यांची वाट लागते. मात्र, हाच अवघड व शारीरिक आणि मानसिक क्षमतेला आव्हान देणारा ट्रेक तब्बल १०० वेळा सावंत यांनी लिलया पार केला आहे.

सावंत यांना टाटा मोटर्समध्ये काम करत असताना पुणे व्हेंचरच्या माध्यमातून गिर्यारोहण आणि पदभ्रमणाची आवड निर्माण झाली होती. या आवडीतून त्यांनी ७ जानेवारीला सकाळी ३६ सहकाऱ्यांसोबत ७ वाजता सुरु केलेला हा ट्रेक दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संपवत केवळ ७ तासांत पूर्ण केला. ट्रेकिंग हे प्रत्येकाने केले पाहिजे, अशी अनिल सावंत यांची भूमिका आहे. त्यामुळे सावंत हे ट्रेकमध्ये चालत्यालाही पळते करतात.

ट्रेकिंग हा छंद असला तरी, त्याच्या माध्यमातून आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी फार चांगली मदत होते. सातत्याने निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे श्वसनविकार, रक्तप्रवाह व कोणत्याही प्रकारचे शारीरिक किंवा मानसिक आजार टाळणे सहज शक्‍य होते. यामुळे प्रत्येकाने गिरीभ्रमण केलेच पाहिजे.

- अनिल सावंत, ट्रेकर, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com