चाकणकरांसाठी खूशखबर; जमिनीचा मोबदला मिळणे सुरु

चाकणकरांसाठी खूशखबर; जमिनीचा मोबदला मिळणे सुरु

राजगुरुनगर - चाकण एमआयडीसीच्या पाचव्या टप्प्यासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला वाटण्यास सोमवारी (ता. 16) खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्या हस्ते सुरवात झाली. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने चाकण औद्योगिक क्षेत्रात पाचव्या टप्प्यात सहा गावांची जवळपास 637 हेक्‍टर जमीन संपादनाची कार्यवाही सुरू केली. या संपादनासाठी सक्ती न करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. शेतकऱ्यांच्या संमतीने कमीत कमी सलग 50 हेक्‍टर क्षेत्र मिळाल्यास संपादनाची कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार संभाव्य भूसंपादन होऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन प्रचलित रेडिरेकनरच्या मूल्यांकनानुसार सर्वानुमते एकरी भाव ठरवला. चाकण, वाकी खुर्द व गोनवडी येथे एकरी 65 लाख रुपये दर निश्‍चित करण्यात आला. आंबेठाण, बिरदवडी आणि रोहकल येथे एकरी 55 लाख रुपयांचा दर निश्‍चित करण्यात आला. त्यानुसार उपलब्ध झालेल्या, गोनवडी गावच्या हद्दीतील 79 हेक्‍टर जमिनीची मोजणी करण्यात येऊन पैकी 68 हेक्‍टरचे निवाडे करण्यात आले. या टप्प्यातील सर्व भूसंपादित शेतकऱ्यांच्या नावे निर्धारित मोबदला रक्कम लाभधारकांच्या बॅंकेच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम वाटपास सुरवात केल्याने खातेदारांनी समाधान व्यक्त केले. 

पाचव्या टप्प्यातील जमिनी संपादित होणाऱ्या गावांतील ज्या जमिनी भामा आसखेडच्या उजव्या कालव्यासाठी भूसंपादन करण्याकरिता अधिसूचित करण्यात आल्या होत्या, त्या जमिनींची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. त्या जमिनींचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. 
- संजय तेली, उपविभागीय अधिकारी, खेड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com