कांदा निर्यातबंदी उठल्याचा सध्या व्यापाऱ्यांनाच फायदा 

हरिदास कड - सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 30 December 2020

राज्यातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या लासलगाव व पुणे जिल्ह्यातील चाकण येथील बाजारात कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत होते.त्यामुळे व्यापारी,निर्यातदार कंपन्या,शेतकरी यांचे आर्थिक नुकसान झाले.

चाकण - कांदा निर्यातबंदी केंद्राने उठविल्याचा फायदा कांद्याची साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांना सर्वाधिक होईल व त्यानंतर शेतकऱ्यांना होईल, अशी शक्यता आहे. सध्या काढणी होत असलेला कांदा निर्यातक्षम नसल्याने जुन्या साठविलेल्या कांद्याची सध्या निर्यात सुरू होईल. पण, शेतकऱ्यांकडे साठवणुकीचा कांदा सध्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प फायदा होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. 

कांद्याच्या निर्यातीवरील बंदी केंद्राने १४ सप्टेंबर रोजी घातली होती. तसेच, २३ ऑक्टोबरच्या आदेशानुसार कांदा साठवणुकीवरही मर्यादा घातली होती. किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांवर कांदा साठवणुकीवर मर्यादा होती. किरकोळ व्यापाऱ्याला दोन टन; तर घाऊक व्यापाऱ्याला २५ टन कांदा साठवण्याची मर्यादा होती. त्यामुळे भाव नियंत्रित झाले होते. मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात उपलब्ध झाला होता. त्यानंतर परदेशातूनही मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्यात आला होता. त्यामुळे देशात आणि राज्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. 

कोरेगाव भीमा येथे नागरिकांची होणार आरोग्य तपासणी 

राज्यातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील चाकण येथील बाजारात कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत होते. त्यामुळे व्यापारी, निर्यातदार कंपन्या, शेतकरी यांचे आर्थिक नुकसान झाले. निर्यातबंदीच्या निर्णयावर शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी बरीच टीका केली होती. बंदी उठवावी, या मागणीसाठी आंदोलने राज्यात व देशात झाली होती. 

त्यात निर्यातबंदी उठविण्याचा केंद्राचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांकडे सध्या किती कांदा उपलब्ध आहे, ही आकडेवारी केंद्राने स्पष्ट केलेली नाही. १ जानेवारीनंतर कांदा निर्यात सुरू होणार आहे. त्यामुळे निर्यातदार कंपन्या व व्यापारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाव वाढण्याची शक्यता 
यंदा पावसाने कांदा रोपांचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे दुबार कांदा लागवडी झाल्याने आणि कांद्याच्या रोपांच्या व बियाण्यांच्या किमती वाढल्याने रब्बी हंगामातील लागवडी घटल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असून, कांद्याचे भाव पुढील काळात वाढतील. तसेच, निर्यात बंदी उठल्याने भाव अधिक वाढतील, अशी दाट शक्यता शेतकरी व व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. 

न्यायालयीन कामकाज पूर्णतः सुरू करण्याला तारीख पे तारीख

कांदा निर्यातबंदी उठविण्याचा केंद्राने चांगला निर्णय घेतला. याचा फायदा सध्या तरी व्यापारी व निर्यातदार कंपन्या यांना होऊ शकतो. सध्या शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेला कांदा नाही. वखारीत व छपऱ्यात साठविलेला कांदा शेतकऱ्यांचा संपलेला आहे. त्यामुळे पुढील काळात नवीन कांदा शेतकऱ्यांचा आल्या तो निर्यातक्षम असेल; तरच शेतकऱ्यांना फायदा होईल. 
- विनायक घुमटकर, सभापती, खेड बाजार समिती 

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेतकरी, व्यापाऱ्यांना फायदा 
केंद्राने निर्यातबंदी उठविण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा फायदा निर्यातदार कंपन्या, व्यापारी व शेतकरी या सर्वांना होईल. कांद्याचे भाव पुढील काळात वाढतील. 
- संजय सोळंकी, गुजरात येथील निर्यातदार 

कांदा निर्यात बंदी करणे व निर्यात उठविणे, हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा एक खेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. निर्यात बंदी उठविल्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. 
- गुलाब गोरे पाटील, कांदा निर्यातदार व व्यापारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chakan news onion export ban is currently benefiting traders