बारामतीचा अवलिया करतोय पाणवठ्यांची निर्मिती.....

baramati
baramati

बारामती : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईअभावी वन्यजीवांचे कमालीचे हाल होतात. अनेक जण या वर फक्त चर्चाच करत राहतात, मात्र बारामतीच्या एका अवलियाने या वन्यजीवांसाठी निव्वळ चर्चा करण्यापेक्षाही काहीतरी करुन दाखविण्याच्या उद्देशाने सातत्याने काम सुरु ठेवले आहे. चकोर शहा (वाघोलीकर) यांनी गेल्या तीन वर्षांपासून वन्यजीवांसाठी वन्यक्षेत्रात पाणवठे तयार करण्याचे वेगळे काम हाती घेतले आहे. 

पाण्याअभावी सैरभैर झालेली हरणे, कोल्हे, ससे व इतर प्राणी पाहिल्यानंतर यांच्या किमान पाण्याच्या सोयीसाठी काहीतरी करावे, असा विचार चकोर वाघोलीकर यांच्या मनात आला. त्यांनी म्हसोबावाडीच्या क्षेत्रात पहिला पाणवठा तयार करुन या कामाचा प्रारंभ तीन वर्षांपूर्वी केला. आज तीन वर्षात चकोर यांनी स्वखर्चाने तसेच इतरांची मदत घेत जवळपास अकरा पाणवठे तयार केले आहेत. त्यांचा हा उत्साह पाहून अनेकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे मदतीचा हात पुढे केला आहे. 

वन्यप्राण्यांसाठीच्या या पाणवठ्यातील पाणी जमिनीत झिरपून जाऊ नये या साठी त्यांनी त्याला सिमेंटची घोटाई केली. साधारणतः सात हजार लिटर पाणी बसेल अशा लांबी रुंदीचे हे पाणवठे त्यांनी तयार केले. स्वताः बांधकाम व्यावसायिक असल्याने त्यांना या बाबतचे परिपूर्ण ज्ञान होते. एकदा पाणी सोडल्यावर किमान दीड आठवडा हे पाणी पुरते, असा त्यांचा अनुभव. 

म्हसोबावाडीनंतर त्यांनी गाडीखेल, गोजुबावी, उंडवडी क.प., कटफळ, पारवडी या परिसरातील वनक्षेत्रात अकरा पाणवठे तयार केले आहेत. मिलिंद पावसकर, सीताराम शर्मा, आरती कोल्हटकर, जयेश पटेल, हितेश पटेल, सचिन मोरे, संगीता शहा, अंकित जैन, प्रदीप दोशी, किशोर लोणकर, लालासाहेब परकाळे, रामप्रसाद जांगीड, अजित सूर्यवंशी आदींनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. संजय जाधव या पाणवठ्याच्या कामासाठी मजूर पुरवठा विनामोबदला करतात, भारत चौधर पाण्याचे टँकर विनामूल्य उपलब्ध करुन देतात. 

वन्यजीवांसाठी एक अवलिया काहीतरी चांगले करु पाहतो आहे, हे पाहून चकोर वाघोलीकर यांच्या मदतीसाठी असंख्य हात पुढे सरसावले व वनक्षेत्रात लोकसहभागातून वन्यजीवांसाठी असे पाणवठे तयार झाले. निव्वळ गप्पा मारुन नाही तर काहीतरी करुन दाखविण्याची किमया या निमित्ताने चकोर वाघोलीकर यांनी साध्य करुन दाखविली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com