सव्वातीनशे कोटी वसुलीचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

पुणे - राज्य सरकारने दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी जेमतेम पाच दिवसांचा अवधी राहिला असताना मिळकतकराचे तब्बल सव्वातीनशे कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. त्याकरिता, थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींना ‘सील’ ठोकण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत महिनाभरात सुमारे शंभर मिळकतींना ‘सील’ केले असून, आणखी शंभर मिळकतींवर ही कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या वर्षभरात म्हणजे, एक एप्रिल २०१६ ते २५ मार्च २०१७ या कालावधीत सुमारे १ हजार ११० कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. पुढील पाच दिवसांत आणखी शंभर कोटी रुपयांपर्यंत महसूल जमा होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मोठ्या रक्कमेची थकबाकी असलेले गृहप्रकल्प आणि व्यावसायिक मिळकतींची स्वतंत्र यादी केली असून, त्यांच्याकडील कर वसुलीवर भर दिल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

मिळकतकर आणि पाणीपट्टी ९० टक्के वसूल करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने महापालिका प्रशासनाला दिले आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ते पूर्ण करण्याची तंबीही दिली आहे. या पाश्‍वर्भूमीवर गेल्या महिनाभरापासून शहरात वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना करूनही कर न भरलेल्या अडीचशे मिळकतींना ‘सील’ करण्यात आले आहे. या कालावधीत सुमारे ८२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. मात्र या वर्षात सुमारे १ हजार ४४५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, त्यापैकी आतापर्यंत १ हजार ११० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आणखी ३३५ कोटी रुपये वसूल करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मिळकतकराची अधिकाधिक वसुली करण्यासाठी महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने पावले उचलली आहेत. 

महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाचे प्रमुख सुहास मापारी म्हणाले, ‘‘मिळकतकर वसुलीसाठी मोहीमेअंतर्गत प्रयत्न सुरू आहेत. त्यातून ८२ कोटी रुपये मिळाले असून, ज्या सोसायट्या आणि दुकानदारांकडे मोठी थकबाकी आहे, त्यांची यादी करून ती वसूल करण्यात येत आहे. ती न भरल्यास मिळकतींना ‘सील’ करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार शहरात सर्वत्र कारवाई करण्यात येत आहे.’’ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The challenge three hundred million recovery