भारताचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य व संविधान सुरक्षित ठेवणे ही मोठी आव्हाने : डॉ. श्रीपाल सबनीस

मिलिंद संधान
रविवार, 29 एप्रिल 2018

आज विकासाचा प्रश्न अजेंड्यावर आणला जात असला तरी पण धार्मिक व जातीय दंगली मुळे तो पराभूत होत आहे. त्यामुळे शांततेशिवाय विकास अशक्य आहे असेही यावेळी श्रीपाल सबनीस म्हणाले.

नवी सांगवी (पुणे) : "जाती धर्माच्या तणावात, दंगलीत भारतीय समाज आणि संस्कृती जळून खाक होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत भारताला एकात्म ठेवणे, त्यात सार्वभौमत्व व स्वातंत्र्य जपणे तसेच, संविधान सुरक्षित ठेवणे, या सारखी फार मोठी आव्हाने आपल्यासमोर उभी आहेत." असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने भगवान गौतम बुध्द आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. सबनीस यांची नियोजित विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. उपस्थितांना उद्देशून आपले विचार यावेळी त्यांनी मांडले.

व्यासपीठावर जेष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव, पुणे पिपल्स सहकाही बँकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे, प्रकाश रोकडे, अशोक पगारिया, प्रकाश जवळकर, अफझलभाई शेख उपस्थित होते. याप्रसंगी कवी चंद्रकांत वानखेडे संपादित 'बाप नावाचा वटवृक्ष' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. 

डॉ सबनीस म्हणाले, "आपल्याकडे स्वातंत्र्य आहे, समता आहे परंतु बंधुता नाही. बंधुता या संकल्पनेच्या संदर्भात एकूण प्रबोधनाची व कृती शिलतेची ऊणीव दूर करण्याच्या दृष्टीने नवीन मांडणी मला नियोजीत बंधुता संमेलनाच्या माझ्या अध्यक्षीय भाषणात करता येईल. आज विकासाचा प्रश्न अजेंड्यावर आणला जात असला तरी पण धार्मिक व जातीय दंगली मुळे तो पराभूत होत आहे. त्यामुळे शांततेशिवाय विकास अशक्य आहे. जातीधर्माच्या पलीकडचा बंधुता हे समाज व राष्ट्र जीवनाचा मध्यवर्ती प्रवाह झाला पाहिजे यासाठी हे बंधुतेचे संमेलन समर्पित आहे. 

सुत्रसंचलनाचे काम यावेळी शंकर आथरे यांनी केले तर आभार महेंद्र भारती यांनी मानले.

Web Title: The challenges of keeping India's sovereignty independence and constitution are safe say Shripal Sabnis