चंद्रकांत पाटील म्हणतात, 'एकत्र येऊन कशाला लढता?'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 January 2020

- हिंमत असेल ना तर स्वतंत्र लढून दाखवा

- एकत्र येऊन कशाला लढता

बारामती : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष भाजपबद्दलचा राग, द्वेष व तिरस्कार यातून एक होत सत्तेवर आले आहेत, अनेक ठिकाणी आम्हाला हरविण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते आहे याचा आम्हाला आनंद आहे. हिंमत असेल ना तर स्वतंत्र लढून दाखवा, एकत्र येऊन कशाला लढता असे आव्हानच आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीला दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामतीत पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भाजपविरोधात केवळ सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र असल्याचा आरोप केला. निवडून आल्यानंतर ते एकत्र आले आहेत, भविष्यात जेव्हा ते एकत्रित निवडणुकांना सामोरे जातील तेव्हा मतदार कोणाला बहुमत देतो हे दिसेलच, असे सूतोवाचही पाटील यांनी यावेळी केले. निवडणूकपूर्व आघाडी करुन सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी लढले तर भाजपच निश्चित विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला. 

दुसऱ्यांदा आई होणार 'ही' बॉलीवूड अभिनेत्री; पाहा फोटो

भविष्यात शिवसेना व भाजप एकत्र येण्याची शक्यता कितपत आहे, असे विचारता पाटील म्हणाले, राजकारणातच नाही तर माणसाच्या जीवनात कधी काय होईल याची गॅरंटी नसते, आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करीत नाही, पण भविष्यात या सरकारमध्ये शिवसेनेला असह्य झाले तर त्यांना भाजप हाच एकमेव ऑप्शन असल्याचे सांगत भाजपने सगळे दोर अजूनही कापलेले नाहीत. हेच एकप्रकारे पाटील यांनी सुचविले. 

कर्जमाफीच्या मुद्यावर सरकार साफ अपयशी ठरलेले आहे, दिलेला शब्द तर सरकारने पाळलेलाही नाही, दोन महिने उलटूनही मंत्र्यांचे खातेवाटप नाही, या राज्यातील शेतकरी वा-यावर आहे. ही दुर्दैवी बाब असल्याची टीकाही पाटील यांनी यावेळी केली. देवाच्या भरवशावर हे सरकार चालले असल्याची टीका त्यांनी केली. सात मंत्र्यांनी घेतलेले सर्वच निर्णय हे असंवैधानिक व बेकायदा असल्याचा गंभीर आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला.

मुख्यमंत्र्यांकडे कोणतेच खाते नाही

मुख्यमंत्र्यांकडेच कोणतेच खाते नाही, अशी स्थिती राज्यात आहे. उद्धव ठाकरे यांची कर्जमाफी फसलेली असून शेतकऱ्यांची सर्वात वाईट अवस्था असल्याची टीका यांनी केली. 

शिवसेनेला कार्यकर्त्यांना द्यायला मंत्रिपदे दहा व राष्ट्रवादीला सोळा मंत्रिपदे मिळाली आहेत. तकलादू खाती सेनेसह कॉंग्रेसकडे दिलेली आहेत, हे सरकार फार काळ चालणार नाही.

सावरकरांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री उपलब्ध नाही

सावकरांबाबत आक्षेपार्ह लिखाणाच्या मुद्यावरुन सावरकरांच्या कुटुंबियांनी काल दिवसभर मुख्यमंत्र्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्री त्यांना दिवसभर उपलब्धच झाले नाही. कारण मुख्यमंत्र्यांकडे सांगण्यासारखे काही राहिलेलेच नाही, सत्तेसाठी शिवसेनेने तत्त्वांना तिलांजली दिली, अशी टीका पाटील यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil Criticizes on Maha Vikas Aghadi