Vidhan Sabha 2019 :  नाराजांची मनधरणी करत चंद्रकांत पाटील रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

स्वपक्षातील डझनभर नाराज आणि बंडाच्या पवित्र्यात असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांची  मोट बांधत कोथरूड मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला

विधानसभा 2019 
पुणे/कोथरूड - स्वपक्षातील डझनभर नाराज आणि बंडाच्या पवित्र्यात असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांची  मोट बांधत कोथरूड मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मतदारसंघात फिरून पाटील यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. ‘माझा विजय हा कोथरूडच्या विकासाला हातभार लावणारा असेल,’ अशी प्रतिक्रियाही या वेळी त्यांनी दिली.

आपल्या उमेदवारीमुळे भाजपमधील नाराजांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिल्यानंतर पाटील यांनी गुरुवारी सकाळी शिवसेनेच्या नेत्यांना गाठून ‘युती’च्या फॉर्म्युल्यावर सविस्तर चर्चा केली. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या घरी जाऊन चहापान घेतले. त्यानंतर त्यांना घेऊन ते अर्ज भरण्यासाठी गेले. त्यानंतर भाजपच्या दुचाकी रॅलीत शिवसैनिकही सहभागी झाले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाटील अर्ज भरण्यासाठी निघाले. खासदार गिरीश बापट, संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री शशिकांत सुतार, नगरसेवक मुरलीधर मोहोळ आदींसह भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. या मतदारसंघातून आजपर्यंत पाच जणांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान, कर्वे रस्त्यावरून दुचाकी फेरी काढल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil filed nominations from kothrud assembly constituency