Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांना पुण्यातील 'या' मतदारसंघातून उमेदवारी?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची नक्की झाले असून त्याची अधिकृत घोषणा थोड्यात वेळात होणार आहे.

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची नक्की झाले असून त्याची अधिकृत घोषणा थोड्यात वेळात होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षानेच पाटील यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. तो पाळण्याचे मान्य केले आहे. कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. येथे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत पक्षाला येथून चांगले लीड मिळाले होते.

चंद्रकांतदादा हे कोल्हापूरमधून उभे राहणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित असलेला कोथरूड हा मतदारसंघ निवडला आहे. दादा हे विधान परिषदेचे आमदार असल्याने त्यांना विरोधी पक्षातील नेते मंडळी टोले मारत होते. ते लोकांमधून निवडून न आल्याची टीका खुद्द शरद पवार यांनी केली होती. ती यापुढे होणार नाही, यासाठी पाटील हे आता विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

येथे आता खुद्द प्रदेशाध्यक्षच उभे राहणार असल्याने मेधा कुलकर्णी यांची संधी हुकली आहे. तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर इच्छुकांनाही आता आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

पुण्यातील कसबा पेठ या मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पुण्याचे खासदार गिरीश बापट हे या मतदारसंघाचे 1995 पासून नेतृत्त्व करीत होते.

मुक्ता या गेली अडीच वर्षे पु्ण्याच्या महापौर आहेत. बापट  हे लोकसभेवर निवडून गेल्याने येथे बदल होणे अपेक्षित होते. त्यानुसार मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने, गणेश बीडकर, धीरज घाटे ,  बापट यांच्या सून स्वरदा यांची नावे येथून चर्चेत होती. मात्र पक्षाने महिला व ज्येष्ठ नगरसेविका म्हणून टिळक यांच्या नावाला पसंती दिल्याचे दिसते आहे.  पक्षाचे महाराष्ट्राचे उमेदवार निश्चित करण्यासाठी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाची बैठक झाली. 

भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होणार आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसेंसह चार उमेदवार निश्‍चित झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हयात मजबूत आहे. त्यामुळे पक्षातर्फे विधानसभा निवडणूकीसाठी भाजपडे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे. जळगाव जिल्हयातील भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातील उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. त्यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, खडसे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आपणच लढणार आहोत असे ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे या मतदा संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडेच अधिक लक्ष होते. 

मात्र, आता पक्षातर्फे मुक्ताईनगरातून एकनाथ खडसे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या शिवाय जामनेर येथून विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे निश्‍चितच आहे, मध्यंतरी ते पाचोरा किंवा जळगाव येथून लढण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, ते आता जामनेर येथूनच लढणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

भुसावळ येथून आमदार संजय सावकारे यांची उमेदवारीला कात्री लावण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र पक्षाने आता त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना पक्षातर्फे पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे जिल्हयात भाजपचे चार उमेदवार निश्‍चित झाले आहेत. चारही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्‍चित केले असून गुरूवार (ता.3) रोजी ते अर्ज भरणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant patil may Contest in kothrud Vidhansaha constituency