चंद्रकांत पाटलांची संधी हुकली; मंत्रिपदावर 'यांची' लागणार वर्णी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीसह शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात "राष्ट्रवादी'चे सर्वाधिक दहा आमदार असल्याने मंत्रिपदाची संधी कोणाला मिळणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली​

पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे निश्‍चित झाल्यानंतर आता पुणे जिल्ह्यात मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांची भूमिका अद्याप अस्पष्ट असल्याने जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसचे दोन आमदार असून, त्यापैकी कोणाला संधी मिळणार काय, याविषयीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीसह शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात "राष्ट्रवादी'चे सर्वाधिक दहा आमदार असल्याने मंत्रिपदाची संधी कोणाला मिळणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली. या दहा आमदारांपैकी पुणे शहरात हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे आणि वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांचा समावेश आहे. हे दोन्ही आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. "राष्ट्रवादी'चे जिल्ह्याचे नेतृत्व आतापर्यंत अजित पवार यांच्याकडे होते. मात्र, त्यांची भूमिका स्पष्ट नसल्याने आता हे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे जाईल, अशी चर्चा आहे. वळसे-पाटील यांचा अनुभव पाहता त्यांची मंत्रिपदी पुन्हा वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. इतर आमदारांपैकी कोणाला संधी मिळणार का, याविषयी पक्षाध्यक्ष शरद पवार हेच निर्णय घेऊ शकतात. 

भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप हे कॉंग्रेसचे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. थोपटे हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यामुळे पक्षाच्या वतीने त्यांचा विचार होणार काय, याकडे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचा एकही आमदार या वेळी जिल्ह्यातून विजयी झालेला नाही, मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बळ आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil missed opportunity Now Dilip walse Patil Can be in cabinet

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: