Vidhan Sabha 2019 : कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णींचे 'असे' होणार पुनर्वसन!

टीम ई-सकाळ
Monday, 30 September 2019

कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्यानंतर स्थानिक आमदार मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या. त्यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चा सुरू असताना त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

पुणे : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांची खलबले मुंबईसह दिल्लीमध्येही झाली. त्यानंतर भाजपतर्फे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये नाराज झालेल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजपसमोर असताना आता त्यावर तोडगा काढण्यास सुरवात केली आहे.

कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्यानंतर स्थानिक आमदार मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या. त्यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चा सुरू असताना त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. आता त्यांची नाराजी दूर करण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यश आले आहे. मेधा कुलकर्णी यांना आता विधान परिषदेवर घेऊ असे आश्वासन देण्यात आले आहे. 

कोथरूड विधानसभा मतदारसंघाबाबत...
2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हा शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे तिथून निवडून आले होते. त्यानंतर 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांनी  स्वतंत्र लढविल्या होत्या. त्यावेळी मोकाटे यांना जवळपास 64 हजार मतांनी पराभूत करत मेधा कुलकर्णी आमदार झाल्या. 

चंद्रकांत पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी दिल्यानंतर कोथरूड वासियांनी या निर्णयास विरोध दर्शविला आहे. पाटील यांनी या अगोदर कधीही लोकांमधून निवडणूक लढविलेली नाही. ते पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेचे सदस्य झाले आहेत. स्वत:च्या कोल्हापूर जिल्ह्यातही त्यांना सेनेच्या ताब्यातील मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेता आला नाही.

त्यामुळे भाजपचे वर्चस्व असलेला कोथरूड मतदारसंघ पाटील यांनी निवडला. आता ते कुलकर्णी यांच्याऐवजी विधानसभेची निवडणूक लढविणार असून कुलकर्णींना विधान परिषदेमधील आपली जागा पाटील यांनी देऊ केली आहे. त्यामुळे कोथरूडकरांचा राग काही प्रमाणात निवळण्याची शक्यता आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे करणार युतीची घोषणा- चंद्रकांत पाटील

- माधव भंडारी म्हणाले, आम्ही खरी धर्मनिरपेक्षता पाळतो 

- शिवस्मारकात 1000 कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा भाजप सरकारचा डाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil promised to Kothrud MLA Medha Kulkarni for Legislative Council