सत्ता बदलली अन्‌ नेत्यांच्या भिंतींवरील प्रतिमाही!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

महापालिकेत पहिल्यांदाच सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या दालनातील भिंतींवर अनेक वर्षे स्थिरावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या छबींची जागा आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या छबींनी घेतली आहे. विविध दालनांच्या भिंतींवरील नेत्यांच्या प्रतिमांचेही परिवर्तन होताना दिसत आहे.

महापालिकेत पहिल्यांदाच सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या दालनातील भिंतींवर अनेक वर्षे स्थिरावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या छबींची जागा आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या छबींनी घेतली आहे. विविध दालनांच्या भिंतींवरील नेत्यांच्या प्रतिमांचेही परिवर्तन होताना दिसत आहे.

महापालिकेत गेली दहा-पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि त्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती. महापौर, सत्तारूढ पक्षनेता आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनापासून विविध विषय समित्यांच्या दालनापर्यंत सर्व ठिकाणी भिंतीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची, तसेच काही ठिकाणी माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांची प्रतिमा लावलेली होती; मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. भाजपचे पहिले महापौर नितीन काळजे झाले, तर सत्तारूढ पक्षनेता म्हणून एकनाथ पवार यांना संधी मिळाली. स्थायी समितीच्या भाजपच्या पहिल्या अध्यक्षा होण्याचा मान सीमा सावळे यांना मिळाला. 

आता खुर्चीवरील नेते बदलल्याने नेत्यांची भिंतींवरील प्रतिमाही बदलत आहेत.

सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांच्या दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्र प्रतिमा शनिवारी लावण्यात आली. महापालिकेच्या भव्य इमारतीच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा असून, मध्यभागी भाजपचे कमळ चिन्ह आहे. खालील बाजूस ‘नई सोच, नई उम्मीद’ व ‘सबका साथ, सबका विकास’ असे घोषवाक्‍य लिहिलेले आहे. अशाच प्रकारची मोठी प्रतिमा स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्याही दालनातही लावली आहे; परंतु महापौर, उपमहापौरांच्या दालनासह विषय समित्यांच्या दालनातील भिंतींवर अद्याप भाजप नेत्यांना स्थान मिळालेले नाही, हे विशेष.

Web Title: changed the image of the leaders on the walls