वायसीएमला स्वस्त दरात वीज?

सुधीर साबळे
बुधवार, 25 एप्रिल 2018

पिंपरी - महापालिकेची मालकी असणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सर्वत्र वातानुकूलित सुविधा उपलब्ध झाली, कायमस्वरूपी गरम पाण्याची सुविधा मिळाली, स्वस्त दरातल्या विजेचा वापर करता आला तर या रुग्णालयाचे रूपच पालटले जाईल. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) नॅचरल गॅस बेस पॉवर जनरेशनच्या माध्यमातून या सर्व सुविधा देणे शक्‍य असून या संदर्भातील प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाठविल्याचे एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर यांनी सांगितले. 

पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये एमएनजीएलने ही सुविधा बसवली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये या रुग्णालयाची वीज बिलात १९ कोटी ८४ लाख रुपयांची बचत झाली आहे. नॅचरल गॅस बेस पॉवर जनरेशन या उपक्रमातून वायसीएम रुग्णालयात वीज, कॅन्टीनमध्ये अन्न तयार करण्यासाठी लागणारा गॅस, गरम पाणी वातानुकूलित सुविधा नॅचरल गॅसच्या आधारे तयार होणाऱ्या विजेच्या माध्यमातून पुरवता येणार आहेत. गॅसद्वारे वीजनिर्मितीसाठी थोड्या जागेची आवश्‍यकता असते. गॅस जनरेटरच्या माध्यमातून वीज तयार करून ती वितरित करण्यात येते. त्यातून आर्थिक बचतही शक्‍य आहे. 

रुग्णालयातील परिस्थिती काय?
सध्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दोन आयसीयू, आठ ऑपरेशन थिएटर, डायलिसिस रूम, रुग्णालय अधीक्षकांची दोन कार्यालये ही ठिकाणे वगळता इतरत्र वातानुकूलित सुविधा नाही. रुग्णालयातील वॉर्ड साधेच असून येथे दिवसभर गरम पाण्याची सोय नाही. रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी एलपीजी सिलिंडरचा वापर होतो.

रुग्णालयाचा दर महिन्याचा विजेचा वापर सुमारे २५ हजार युनिट असून बिल २० लाख रुपयांपर्यंत जाते.

नॅचरल गॅस बेस पॉवर जनरेशनच्या माध्यमातून रुग्णालय अत्याधुनिक करता येणे शक्‍य आहे. रुग्णालयाला किती मेगावॉट विजेची आवश्‍यकता आहे, त्यानुसार आवश्‍यक मेगावॉट क्षमतेचा प्लांट बसवला जाऊ शकतो. यासंदर्भात लवकरच महापालिका आयुक्‍तांकडे सादरीकरण होईल. 
- अरविंद तांबेकर, व्यवस्थापकीय संचालक, एमएनजीएल

Web Title: cheap rates electricity to YCM hospital