निरक्षरांचा साक्षरांना ‘धडा’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

कशासाठी हवे होते कर्ज? 
फसवणूक झालेल्या महिला झोपडपट्टीतील आहेत. त्यापैकी संगीता वाघमारे यांना नवीन शिलाई मशिन आणि इतर साहित्य घेण्यासाठी कर्ज हवे होते; तर महानंदा बबन डुनघव यांना पावसाळ्याआधी घराची डागडुजी करायची होती. तर, काहींना कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करायचा होता. अवघा ६०० रुपये हप्ता द्यावा लागणार असल्याने महिला कर्जासाठी तयार झाल्या.

पिंपरी - बनावट कॉल, ई-मेलच्या जाळ्यात सापडून लाखोंची फसवणूक करून घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण उच्चशिक्षितांचे आहे; परंतु वेळीच सतर्कता दाखविल्यास असे फसविणारे जेरबंद होऊ शकतात, हे लांडेवाडीतील १९ अशिक्षित महिलांनी शिक्षितांना दाखवून दिले आहे. उमेश वासुदेव वाघमारे (वय ३८, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे.

निरक्षर व हातावरचे पोट असणाऱ्या महिला त्याचे सावज असायच्या. किरकोळ व्यवसायासाठी पतसंस्थेचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून खाते व शेअर्ससाठी म्हणून तो १,०५० रुपये घ्यायचा. नंतर दोन दिवसांत येतो, असे सांगून तो पोबारा करायचा. परंतु, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच महिला त्याच्या मागावर राहिल्या. नंतरच्या पंधरा दिवसांत तो पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात दिसताच चारही बाजूंनी घेरत चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले.

याबाबत अनसूया रामा बाबरे (वय ४६, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची एमआयडीसी परिसरास चहाची टपरी आहे. महिनाभरापूर्वी वाघमारे चहासाठी आला. त्याने आपण जगदीश आबोरे असे नाव सांगत ‘तुम्ही टपरीत माल का ठेवत नाही,’ अशी विचारणा केली. त्यासाठी पैसे नसल्याचे अनसूया यांनी सांगितले. काही दिवसांनी तो परत आला आणि भारतीय महिला नागरी पतसंस्थेत ओळख असून, ३० हजार कर्ज देतो. मात्र, त्यासाठी १५ महिलांचा गट असायला हवा, असे सांगितले. यावर विश्‍वास ठेवत अनसूया यांनी लांडेवाडी परिसरातील १९ महिलांना एकत्र केले. आरोपीने त्यांना पतसंस्थेच्या अर्जाची झेरॉक्‍स देत त्याच्यावर सह्या घेतल्या. खाते सुरू करण्यासाठी ५०० रुपये आणि ५५० रुपयांचे शेअर्स असे प्रत्येकाकडून एक हजार ५० रुपये जमा केले. मात्र, वाघमारे हा फसवणूक करू शकतो, अशी शक्‍यता वाटल्याने अनसूया यांनी आरोपीचा फोटो गुपचूप काढून घेतला.

पैसे घेतल्यावर आरोपी वाघमारे याने फोन चार दिवस बंद ठेवला. त्यानंतर फोन केल्यावर तो घेण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे महिलांनी जाब विचारण्यासाठी पतसंस्थेवर धडक दिली. त्या वेळी तेथे आबोरे नावाचा कुणीही नसल्याचे समजले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. महिला पतसंस्थेतून तक्रार देण्यासाठी संत तुकारामनगर पोलिस चौकीत जाण्यासाठी निघाल्या. त्या वेळी त्यांना वाघमारे हा रस्त्यात दिसला. संताप अनावर झालेल्या महिलांनी त्याचा थेट गळा धरला. मात्र, हिसका देत तो पळून गेला. आसपासच्या नागरिकांनी दुचाकीवर पाठलाग करून त्याला पकडले.

Web Title: Cheating Crime