तब्बल सात कोटी सहा लाख रुपयांना घातला गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

शेअर मार्केटच्या नावाखाली २२ टक्के जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी चारशेहून अधिक नागरिकांना तब्बल सात कोटी सहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे - शेअर मार्केटच्या नावाखाली २२ टक्के जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी चारशेहून अधिक नागरिकांना तब्बल सात कोटी सहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महेशकुमार भगवानदास लोहिया (रा. सिंहगड रस्ता) व सुनील पुरुषोत्तम सोमाणी (रा. बोपोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रजनी धनंजय मोहिते (वय ५१, रा. पिंपळे निलख) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार आठ नोव्हेंबर २०१६ ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधीत शुक्रवार पेठेत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहिया व सोमाणी या दोघांनी शुक्रवार पेठेमध्ये ‘शिवकन्या अँड शिवकन्या इन्व्हेस्टमेंट’ नावाचे कार्यालय २०१६ मध्ये थाटले. त्याद्वारे त्यांनी नागरिकांना विश्‍वासात घेऊन त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास २२ टक्के जादा परतावा मिळेल, अशा स्वरूपाचे आमिष दाखविले. 

त्यानुसार फिर्यादी यांना आमिष दाखविल्याने त्यांनी आरोपींकडे दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, लोहिया व सोमाणी यांनी फिर्यादी यांनी दिलेली रक्कम शेअर मार्केटमध्ये न गुंतविता स्वतःच्या नावे बॅंकेमध्ये जमा केली. याच पद्धतीने दोघांनी शहराच्या वेगवेगळ्या भागांतील तब्बल चारशेहून अधिक नागरिकांची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating Crime