‘ई वॉलेट’द्वारे फसवणुकीचा फंडा

पांडुरंग सरोदे
शुक्रवार, 26 जुलै 2019

...अशी होते फसवणूक  
जुन्या वस्तूंची ऑनलाइन विक्री करणाऱ्या नागरिकांना सायबर गुन्हेगार आपले सावज बनवित आहेत. हे गुन्हेगार संबंधित व्यक्तीस आपण ग्राहक असल्याचे भासवतात. थोडीफार आगाऊ रक्कमही देतात. त्यानंतर ‘गुगल पे’, ‘फोन पे’ यांसारख्या ‘ई वॉलेट’द्वारे पैसे देणार असल्याचे सांगतात. त्यासाठी नागरिकांना ठराविक ‘ई वॉलेट’ ॲप डाउनलोड करण्यास सांगतात. त्यावरून ‘पेमेंट रिक्वेस्ट’ पाठवितात. त्यानंतर तत्काळ त्यांना ‘पे’ हा पर्याय वापरण्यास सांगतात. ‘पे’ हा पैसे जाण्यासाठीचा पर्याय आहे, याचा क्षणभर विसर पडून नागरिक हा पर्याय वापरतात. त्यानंतर सुरवातीला पाठविलेल्या ‘पेमेंट रिक्वेस्ट’मध्ये बदल करून गुन्हेगार त्यांना हवी तितकी रक्कम त्यामध्ये टाकून ती लंपास करतात.

पुणे - जुनी गाडी विकण्यासाठी नामांकित कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री करणाऱ्या एका ॲपवर गाडीचे छायाचित्र व अपेक्षित किंमत यासह इतर आवश्‍यक माहिती देऊन जाहिरात केली. दोन दिवसांनी एका व्यक्तीने त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधून गाडी घेण्याची इच्छा व्यक्त केली. संबंधित व्यक्तीने पैसे पाठविण्यासाठी त्याला एका नामांकित कंपनीचे ‘पे ॲप’ डाउनलोड करायला सांगितले. त्यानंतर ‘पेमेंट रिक्वेस्ट’ पाठवून त्याने तरुणाला ‘पे’ हा पर्याय वापरण्यास भाग पाडले. त्यानंतर काही कळण्याच्या आतच त्याच्या खात्यामधील २५ हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. या पद्धतीने वेगवेगळ्या ‘ई वॉलेट’शी छेडछाड करुन सायबर गुन्हेगारांनी तब्बल २०० हून अधिक जणांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

कार, दुचाकी, फर्निचर यांसारख्या जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री करण्यासाठी अलीकडे विविध प्रकारच्या वेबसाइट, ॲप वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे वेळ, कष्ट व पैशांचीही बचत होते; परंतु ऑनलाइन खरेदी-विक्रीचा वापर करताना अनेक नागरिकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांत वाढले आहेत. जानेवारी ते जुलै २०१९ या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये शहरातील २०० पेक्षा जास्त नागरिकांची या पद्धतीने फसवणूक झाली आहे. विशेषतः ‘ई वॉलेट’चा वापर करण्याची जबरदस्ती करून फसवणूक केली जात असल्याचे सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण औटे यांनी सांगितले.

ओएलएक्‍स, क्विकर अशा ॲपचा वापर करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताता पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. 
- जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

माझा जुना फोन विकण्यासाठी मी ओएलक्‍सवर जाहिरात केली होती. त्यानंतर एका व्यक्तीने मला फोन केला. तेव्हा त्याने पैसे पाठविण्यासाठी मला ‘गुगल पे’चा क्‍यूआर कोड मागितला. त्यानंतर त्याने पाच हजार रुपयांची ‘पेमेंट रिक्वेस्ट’ पाठविली. पण मला संशय आल्याने मी पुढचा व्यवहार करणे टाळले.
- सौरभ निकम, ग्राफीक डिझायनर (मोबाईल ॲप्लिकेशन)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating by e volet Crime