लिंक उघडली; फसवणूक झाली!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पुणे - वैशाली (नाव बदलले आहे) नावाच्या तरुणीला एका मोबाईलवरून व्हॉट्‌सॲपवर अचानक मेसेज आला...त्या मेसेजमध्ये एक लिंक होती...तिने ती लिंक उत्सुकतेने उघडली...त्यानंतर मैत्रिणीकडून तुझ्याकडे पेटीएम वॉलेट आहे का, अशी विचारणा करण्यात आली...मला पैशांची फार गरज आहे, असा मेसेज आला...मैत्रीण अडचणीत असल्यामुळे पेटीएम अकाउंटवरून पैसे हस्तांतरित केले आणि नेमकी तिथेच फसवणूक झाली...अशा प्रकारे वैशालीसह दहा तरुणींची २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्‍तीकडून विशेषतः महिलांना, महाविद्यालयीन तरुणींना मेसेज पाठविले जातात. त्यामध्ये ‘ओपन धिस लिंक’ किंवा ‘व्हेरिफाय धिस लिंक’ अशा प्रकारची लिंक पाठवली जाते. ती लिंक उघडली की तिच्या मोबाईलमधील ‘कॉन्टॅक्‍ट लिस्ट’ त्या व्यक्‍तीच्या हाती पडते. ती व्यक्‍ती मोबाईल हॅक करून विशेषतः मुलींना त्यांच्या मैत्रिणीच्या मोबाईल नंबरवरून मेसेज पाठविते.

मैत्रिणीच्या मोबाईल नंबरचा वापर करून पेटीएम वॉलेट आहे का, अशी विचारणा केली जाते. त्यानंतर चॅटिंगदरम्यान पैशांची खूप गरज असल्याचे सांगून पेटीएमद्वारे पैसे पाठविण्यास सांगितले जातात; परंतु माहिती घेतल्यास ती व्यक्‍ती तुमची मैत्रीण नसून सायबर गुन्हेगार असल्याचे समोर येते. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या तरुणींमध्ये इयत्ता बारावी ते पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनींचा समावेश आहे.

शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. फसवणुकीचा एखादा ट्रेंड समजून तपास पूर्ण होईपर्यंत सायबर गुन्हेगारांकडून नवीन ट्रेंड आणला जातो. अशा गुन्हेगारांना रोखण्यासाठी सायबर पोलिस तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत; परंतु नागरिकांनीही आवश्‍यक खबरदारी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. 
- सुनील पवार, वरिष्ठ निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा

ही काळजी घ्या...
पैसे देण्यापूर्वी केवळ चॅटिंगवर अवलंबून राहू नये
मोबाईलवर बोलून खात्री करून घ्यावी
अनोळखी लिंक उघडू नका अथवा फॉरवर्ड करू नका
लिंक चुकून उघडल्यास मोबाईल फॉरमॅट करून घ्यावा 
अनोळखी व्यक्‍ती मेसेज करीत असल्यास ब्लॉक करावा
मोबाईलचा आयएमईआय क्रमांक शेअर करू नका

Web Title: cheating on mobile whatsapp