मलठण-कवठे येमाई रस्त्यावर रासायनिक पावडर

युनूस तांबोळी
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीने नाकारलेली रासायनिक पावडर मलठण-कवठे येमाई रस्त्यावर फेकून दिली जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीने नाकारलेली रासायनिक पावडर मलठण-कवठे येमाई रस्त्यावर फेकून दिली जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कंपन्यांच्या माध्यमातून रासायनिक पावडरचा वापर केला जातो. नाशिककडे जाण्यासाठी मलठण-कवठे रस्ता यासाठी सोईस्कर झाला आहे. यामुळे या भागातून या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. महागणपती रांजणगाव ते ओझरच्या विघ्नहर्ता गणपतीकडे जाण्यासाठी हा रस्ता सोईस्कर असल्याने या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे अष्टविनायक दर्शन करणारे राज्य व परराज्यांतून भाविक या मार्गाचा अवलंब करताना दिसतात. त्याचाच फायदा घेत रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील मालाची वाहतूक होते. कंपन्यांना लागणारा कच्चा मालाची या मार्गाने वाहतूक केली जाते. औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक पावडरची देखील वाहतूक होत असते. अनेक वेळा असा कच्चा माल कंपन्या नाकारतात. हा माल कंपनीत ठेवून घेतला जात नाही. त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. त्यामुळे तो रस्त्यावर जागोजागी फेकून दिला जातो. त्यामुळे अशा रासायनिक पावडरमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. सध्या मलठण-कवठे रस्त्यावर अशी पावडर फेकून देण्यात आली आहे. या बाबत आरोग्य विभागाने तत्काळ पाहणी करून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र या परिसरातील नेते मंडळीदेखील याकडे दुर्लक्ष करत आहेत.

तक्रारींची दखल नाही
गेल्या वर्षी देखील या भागात असे रासायनिक पावडर अवजड वाहनाने येथेच टाकून दिली होती. त्या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. परंतु या तक्रारीवर कोणतीच कारवाई झाली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

Web Title: Chemical powders on the Malthan Kawate Yamai road