

चेन्नई, ता. १२ (पीटीआय) : तमिळनाडूतील दारूची ७१७ सरकारी दुकाने बंद करण्याचा आदेश नवनिर्वाचित मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी मंगळवारी दिला. यापैकी २७६ दुकाने धार्मिक स्थळांजवळ आहेत.
राज्यातील महिलांकडून आणि काही राजकीय पक्षांकडून दारूबंदी लागू करण्याची मागणी केली होती. सरकारकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून, हा निर्णय जनहित लक्षात घेऊन घेण्यात आला आहे, असे त्यात म्हटले आहे.
विरोधी पक्ष द्रमुकने या निर्णयाची खिल्ली उडवून हा निर्णय केवळ ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचे म्हटले आहे. तमिळनाडूमध्ये दारूविक्री हा सरकारच्या महसुलातील एक महत्त्वाचा स्रोत आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, पुढील दोन आठवड्यांत धार्मिक स्थळांच्या जवळील २७६ दुकाने, शैक्षणिक संस्थांजवळील १८६ दुकाने आणि बसस्थानकांनजीक असलेली २५५ दुकाने बंद करण्यात येणार आहेत. महिलांकडून आणि ‘पीएमके’सारख्या काही राजकीय पक्षांकडून राज्यातील सर्व दारूची दुकाने बंद करून दारूबंदी लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. नवनिर्वाचित विजय यांच्या सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ‘द्रमुक’चे प्रवक्ते सरवनन अण्णादुराई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, ‘‘संबंधित दुकाने धार्मिक स्थळे आणि शैक्षणिक संस्थांजवळ नाहीत. नवीन दुकाने उघडून ती बंद करणार का? हा फक्त पब्लिसिटी स्टंटच आहे. या निर्णयातून काहीही साध्य होणार नाही.’’
दरम्यान, सध्या तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशनतर्फे राज्यभरात ४,७६५ दारू दुकाने चालवली जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.