Chhagan Bhujbal : भाजपच्या नेत्यांनीही मुस्लिम धर्मीयांसोबत लग्न केलंच की... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : भाजपच्या नेत्यांनीही मुस्लिम धर्मीयांसोबत लग्न केलंच की...

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वरिष्ठ नेत्यांपैकी अनेकांच्या मुला-मुलींनी मुस्लिम धर्मियाबरोबर लग्न केले आहे. याबद्दल या सर्वांचे अभिनंदन केले पाहिजे. परंतु सध्या धार्मिक भावना चेतावण्यासाठी जाणीवपूर्वक विविध प्रकार अवलंबिले जात आहेत. यामागे हिंदू-मुस्लिम लढाई सुरु झाली पाहिजे, हाच हेतू असून जेणेकरून यामुळे त्यांना निवडणुकीसाठी फायदा होऊ शकेल, अशी त्यांची भावना झाली आहे. त्यातूनच ‘लव्ह जिहाद’सारखे मुद्दे जाणीवर्पूक पुढे करू लागले असल्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता.२८) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देशात बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चालले आहेत. या सर्व प्रश्‍नांना फाटा देणे आणि या मूळ प्रश्‍नांवर पांघरून घालणे, हाही एक उद्देश या ‘लव्ह जिहाद’ या मुद्द्याच्या मागे त्यांनी ठेवला आहे. याशिवाय महापुरुषांविषयी अपमानास्पद वाक्‍ये बोलली जात आहेत. यातूनच जाती-जातीत आणि धर्मांमध्ये भांडणे लाऊन, त्यात जनतेला गुंतवून ठेवले जात आहे, असा आरोपही भुजबळ यांनी यावेळी केला.

महात्मा जोतिराव फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेच्यावतीने पुण्यातील समता भूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी भुजबळ पुण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना नाशिक येथील "लव्ह-जिहाद' विषयावर काढण्यात आलेल्या मोर्चाबद्दल विचारले असता, त्यांनी हे मत व्यक्त केले.

भुजबळ पुढे म्हणाले, ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात "अथर्वशीर्ष' घेण्यासाठीचा निर्णय घेण्यासाठी कोणतीही अभ्यास समिती अस्तित्वात नाही. या विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू हे प्रभारी आहेत. त्यामुळे त्यांना तो अधिकार नाही, कोणाची परवानगी नाही. असे असताना खुशाल तुम्ही त्याला श्रेयांक देणार, असा मुद्दा उपस्थित करून आपण कुठे घेऊन चाललो आहे हे सगळे, असा प्रश्‍न भुजबळ यांनी यावेळी केला. या निर्णयामुळे सगळ्या धर्मात अशा काहीतरी असलेल्या गोष्टीही शिकवाव्या लागतील. विज्ञान, अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र, माहिती तंत्रज्ञान वगैरे असले विषय आता शिकायचे नाही का? यातून मन:शांती मिळणार आहे का?.’’

‘... आता भिडे वाड्याच्या प्रश्‍नावर बैठक घ्या’

मंत्रालयात महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्याच्या तैलचित्राचे अनावरण नुकतेच करण्यात आले आहे. या तैलचित्राच्या मंत्रालयातील अनावरणानंतर सावित्रीबाई फुले यांनी मुलींची देशातील पहिली शाळा सुरु केलेल्या पुण्यातील भिडे वाड्याच्या प्रश्ं‍नाबाबतही लवकर बैठक घ्या, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्यावर राज्य सरकार काय निर्णय घेते, याची महिनाभर प्रतिक्षा केली जाईल. अन्यथा यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.