पुणे : छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी खुला; दोन महिन्यांपासून होता बंद!

Pune_Traffic
Pune_Traffic

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मागील दोन महिन्यापासून बंद असलेला छत्रपती शिवाजी महाराज रस्ता अखेर सोमवारी (ता.८) दुपारनंतर वाहतुकीसाठी खुला झाला. त्यामुळे शिवाजीनगरहून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. बाजीराव रस्त्यावरील तात्पुरत्या दुहेरी मार्गातून जाण्यापासूनही वाहनचालकांची आता सुटका झाली आहे. 

शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 23 मार्चपासून शहरात लॉकडाऊन सुरू झाला. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच खडक, फरासखाना व समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोरोना संसर्ग वाढला. त्यामुळे कसबा पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ, गणेश पेठ या भागांना जोडणारा आणि शनिवारवाड्याहून स्वारगेटला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बंद करण्यात आला. त्याचवेळी बाजीराव रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात दुहेरी वाहतुक सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, मागील आठवड्यात संचार मनाई आदेश काही प्रमाणात शिथील केल्यांतर सोमवारपासून शहरातील सर्व व्यावसाय, खासगी, सरकारी कार्यालये, विविध कंपन्या नियमीतपणे सुरू झाल्या. काही दिवसांपूर्वीच विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बंद केलेले रस्ते खुले करण्यात आले.

सोमवारपासून शहर पूर्ववत होऊ लागल्याने बाजीराव रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बंद असल्यामुळे बाजीराव रस्त्याने दुहेरी वाहतुकही सुरू होती. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्‍यता होती.

पुणे पोलिसांकडून त्याची तत्काळ गांभीर्याने दखल घेण्यात आली. दुपारी तीन वाजल्यापासून शनिवारवाडा, त्यानंतर जिजामाता चौक, मजुर अड्डा चौक, बेलबाग चौक आणि त्यापुढील रस्त्यावर असणारे बॅरीकेड्स, पत्रे आणि अन्य अडथळे काढण्यास पोलिसांकडून सुरूवात करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच हे अडथळे बाजूला सारून संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र प्रतिबंधीत क्षेत्रात येणारे आणि शहराच्या पूर्व भागाकडे जाणारे रस्ते बंदच ठेवण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com