पुणे: भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप केशवराव निंबाळकर (वय 45) यांचा आज (ता. 5) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रिव्हॉल्वर साफ करताना चुकून उडालेली गोळी लागून मृत्यू झाला.
राज्यातील साखर कारखानदारीत अग्रेसर समजल्या जाणाऱ्या छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रदीप निंबाळकर यांची पाच दिवसांपूर्वीच (ता. 31) बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्या निवडीनंतर जेसीबीने गुलाल उधळून आनंदोत्सवही साजरा करण्यात आला होता. परंतु, आज झालेल्या त्यांच्या मृत्यूमुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह इंदापूर व बारामती परिसरात मोठा धक्का बसला आहे.
प्रदीप निंबाळकर हे आज दुपारी सणसर (ता. इंदापूर) येथील राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर होते. तेथे ते रिव्हॉल्वर साफ करत होते. त्यावेळी चुकून गोळी उडाल्याने ते जखमी झाले. गोळीच्या आवाजाने घरातील सदस्यांनी जाऊन पाहिले असता, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर तातडीने त्यांना बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.