पुणे विद्यापीठाविषयी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

पुणे - सहायक प्राध्यापकांसाठी असलेली राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण होऊनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याचे प्रमाणपत्र देत नाही, त्यासाठी वेळकाढूपणा करीत असल्याची तक्रार प्रणिता कदम या विद्यार्थिनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुणे - सहायक प्राध्यापकांसाठी असलेली राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण होऊनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याचे प्रमाणपत्र देत नाही, त्यासाठी वेळकाढूपणा करीत असल्याची तक्रार प्रणिता कदम या विद्यार्थिनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

प्रणिताने गेल्या वर्षी पर्यावरणशास्त्र हा विषय घेऊन सेट परीक्षा दिली होती, त्यात ती उत्तीर्ण झाली; परंतु विद्यापीठाकडून त्याचे प्रमाणपत्र मिळत नसल्याची तिची तक्रार आहे. प्रणिता म्हणाली, 'मी "मास्टर इन एन्व्हायर्न्मेंट मॅनेजमेंट' या अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. त्यातील बहुतांश विषय हे "एम.एस्सी.'चे आहेत. "ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट' आणि "फायनान्शियल अकाउंटिंग' हे दोन विषय केवळ वेगळे आहेत. त्यामुळे विद्यापीठाने मला सेट उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र द्यायला हवे, त्यासाठीच मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.''
प्रमाणपत्र देता येणार नाही

याबाबत विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस म्हणाले, 'पर्यावरणशास्त्र हा विषय विज्ञान शाखेशी संबंधित आहे. प्रणिता कदम हिने एम.एस्सी. केलेले नाही, तरीही तिने "सेट'साठी अर्ज भरताना एम.एस्सी.चा पर्याय निवडला, त्यामुळे तिला परीक्षा देता आली. तिने पर्यावरण व्यवस्थापन अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ती एम.एस्सी. अभ्यासक्रमाशी समकक्ष नाही, त्यामुळे तिला सेट उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देता येणार नाही.''

यंत्रणेचा अभाव
सेट परीक्षेचे अर्ज भरताना तिची शैक्षणिक पात्रता तपासण्यात का आली नाही, या प्रश्‍नावर डॉ. कापडणीस म्हणाले, 'अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जांची छाननी करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही; परंतु आता अर्ज भरतानाच विद्यार्थ्याची पदव्युत्तर पदवी कोणत्या विद्याशाखेची आहे, हे तपासण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.''

Web Title: chief minister complaint about pune university