मुख्यमंत्री फक्त चांगले भाषण करतात - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सोमेश्वरनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगल्या भाषणाशिवाय नवीन काही करत नाहीत. पालकमंत्री शहरी असल्याने त्यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण नाही, अशा टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

सोमेश्वरनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगल्या भाषणाशिवाय नवीन काही करत नाहीत. पालकमंत्री शहरी असल्याने त्यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण नाही, अशा टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

निंबूत (ता. बारामती) येथे गावभेट दौऱ्यामध्ये सुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ नेते बी. जी. काकडे, सोमेश्वरचे संचालक महेश काकडे, उदय काकडे आदी उपस्थित होते. निंबूतनंतर सुळे यांनी गडदरवाडी व खंडोबाचीवाडी येथेही ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.  

राजधानी दिल्लीमध्ये संविधान जाळण्याचा प्रयत्न झाला. पंतप्रधानांनी यावर वक्तव्यच न करणे कितपत योग्य आहे, याचा समाज म्हणून आपण विचार केला पाहिजे. पंतप्रधानांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, असा शब्द दिला होता. पण चार वर्षांत आठ कोटी नोकऱ्यांऐवजी सत्तर लाखच नोकऱ्या मिळाल्याची माहिती पुढे आली आहे, असे सांगत सुळे यांनी मोदी यांनाच लक्ष्य केले.

बेरोजगारी हे सर्वांत मोठे आव्हान आहे. साखर कारखान्यात हजार लोक असायचे. आता नव्या कारखान्यात दीडशे लोक काम करतात. देशात सगळ्यात जास्त आत्महत्या, महिला अत्याचार, कुपोषण या बाबी महाराष्ट्रात होत आहेत. बुलेट ट्रेन जपानमध्ये बनणार असल्याने आपल्या येथे रोजगार मिळणार नाही. ती अहमदाबादला जाणार आहे. बुलेट ट्रेनला विरोध नाही, पण येथील साधारण रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी ते पैसे वापरता आले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मला जातींचे भेद २०१४ नंतर कळू लागले. २०१४ च्या निवडणुकीमध्ये राज्य ढवळून निघाले. त्यापूर्वी राजकारणात जात-धर्म नव्हते. आता ते ज्या गतीने वाढत चालले आहे त्याबाबत चिंता वाटते. मराठा, धनगर, लिंगायत अशा समाजांची आंदोलने सुरू आहेत. आधीही आंदोलने व्हायची पण समाजात एवढा आक्रोश, अस्वस्थता आधी नव्हती. साठ वर्षांत नव्हते असे वातावरण आता झाले आहे. दलित समाज अस्वस्थ आहे. राज्याचे व देशाचे काय होईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. निवडणुका येतात आणि जातात. पण अशी अवघड परिस्थिती झाली तर कसे होणार. 
- सुप्रिया सुळे, खासदार

Web Title: Chief Minister only makes good speeches supriya sule