बालगुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठी हाक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पुणे - शहरात घडणाऱ्या काही गुन्ह्यांमध्ये बऱ्याचदा अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. अशा मुलांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शहर पोलिसांनी पावले उचलली आहेत. या बालगुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिस आयुक्‍त के. वेंकटेशम यांनी केले आहे.

शहरात चोरीपासून अनेकदा गंभीर गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगारांसोबत अल्पवयीन मुलांचाही समावेश असतो. शाळेत न जाता काही मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. अशा अल्पवयीन मुलांवर कारवाई करताना पोलिसांवर मर्यादा येतात. गेल्या तीन वर्षांत शहरात विविध गुन्ह्यांमध्ये एक हजार ९०० हून अधिक अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. अशा मुलांची बालसुधारगृहात रवानगी केली जाते. तसेच, गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांना बोलावून समुपदेशनही केले जाते. शहर पोलिसांकडून ‘भरोसा’ उपक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिलांसोबतच अल्पवयीन मुलांच्या समुपदेशनाचे काम सुरू आहे. ज्यांना पालकच नाहीत, अशा मुलांच्या पुनर्वसनासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे. अशा संस्थांनी पोलिस आयुक्‍तालयात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्‍त के. वेंकटेशम यांनी केले आहे.

बालगुन्हेगारीचे वाढते प्रमाण गंभीर आहे. काही स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. अशा संस्थांनी सहकार्य केल्यास गुन्हेगारी कमी होऊन मुलांचे भविष्य चांगले होण्यास मदत होईल. 
- के. वेंकटेशम, पोलिस आयुक्‍त

Web Title: Child Criminal rehabilitation k venkatesham