मुलांनी रंगमंचावर मांडला ‘व्हॉट्‌सअॅप तमाशा’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

पुणे - आजची लहान मुले मैदानापेक्षा गेम खेळण्यामध्ये अधिक रस घेतात, अशी तक्रार केली जाते; परंतु, काही मुलांनी रंगमंचावर येऊन सध्या सुरू असलेल्या ‘व्हॉट्‌सॲप तमाशा’चे विविध रंग नाट्यमयरीत्या उलगडून दाखविले. आपल्यातील सुप्त कलागुण ते रंगमंचावरून सादर करत होती आणि सभागृहात बसलेले शिक्षक, पालक, प्रेक्षक त्यांचा उत्साह वाढवत होते.

हे आनंददायी चित्र पाहायला मिळाले १४व्या महाराष्ट्र राज्य हौशी बालनाट्य स्पर्धेत. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ही स्पर्धा भरविण्यात आली आहे. यात पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर, सातारा, तळेगाव दाभाडे, वाघोली, नागपूर, वाई, साखरवाडी यासह इतर भागातील ३४ संघ सहभागी झाली आहेत. 

यानिमित्ताने शेकडो बालकलाकारांचा नाट्याविष्कार पाहायला मिळत आहे. राजा-राणीची गोष्ट, सजीव खेळणी अशा विषयांपासून पृथ्वीचा सत्यानाश, व्हाट्‌सॲपचा तमाशा या नाटकांच्या माध्यमातून आजच्या काळातील विषयही मुले मोठ्या ताकदीने आणि कुतूहलाने सादर करत आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बफरिंग, राष्ट्रीय दुर्लक्षित खेळणी दिवस, शोध, परश्‍या, गणपती बाप्पा हाजीर हो, हाका नाका मका नका, हॅलो ब्रदर, सिंहगडाला जेव्हा जाग येते, अशी विविध विषयांवरील नाटके शालेय मुलांनी सादर केली. ही स्पर्धा नेहरू सांस्कृतिक भवन येथे शुक्रवारपर्यंत (ता. ९) सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळात रंगणार आहे. प्रेक्षकांना स्पर्धेतील नाटके विनामूल्य पाहता येणार आहेत.

बालनाट्य स्पर्धेला प्रतिसाद वाढत आहे. नेहमीच्या संघापेक्षा यंदा अनेक नवे संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. अशा स्पर्धेतून मुले स्वत:ला व्यक्त करायला शिकतात. त्यांच्यातील संवाद कौशल्य वाढते आणि त्यांच्यातील कलाकार घडण्यासही मदत होते. त्यामुळे या स्पर्धेला वेगळे महत्त्व आहे.
-अमिता तळेकर, सहायक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय

Web Title: child drama competition