नवरदेवाची व कुटुंबियांची वरात थेट पोलिस स्टेशनच्या दारात

सोमनाथ भिले
Monday, 30 November 2020

बारामतीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या सतर्कतेमुळे डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे आज (ता. ३०) रोजी होत असलेला बालविवाह रोखण्यात यश आले.

डोर्लेवाडी : बारामतीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या सतर्कतेमुळे डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे आज (ता. ३०) रोजी होत असलेला बालविवाह रोखण्यात यश आले. नवरदेवाऐवजी कुटुंबियांची वरात मात्र पोलिस स्टेशनच्या दारात निघाली.

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर दुधाचा टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत

डोर्लेवाडी येथे भटकंती करून उदरनिर्वाह करणारा वैदू समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजात शिक्षणाचा अभाव व जुन्या रूढी परंपरा,चालीरीतीचा पगडा अजूनही कायम असल्याने बालविवाह सारख्या प्रथा या समाजात घडत असलेल्या आजही पाहावयास मिळत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक संस्थांनी अनेक वेळा प्रबोधन, जागृती करूनही या समाजात म्हणावा तेवढा बदल झाल्याचे दिसून येत नाही. आज येथील निंबाळकर कुटुंबाच्या मुलीशी केडगाव (ता. दौंड)  येथील शिंदे कुटुंबाच्या मुलाबरोबर डोर्लेवाडी येथे  विवाह समारंभ होणार होता. मंडप,वाजंत्री,जेवण अशी सर्व तयारीही झाली होती. मात्र विवाह होणारी  मुलगी अल्पवयीन असल्याबाबतची माहिती लग्न पत्रिका व मुलीचा फोटो तहसीलदार बारामती यांना कोणीतरी दिल्याने त्यांनी बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना माहिती दिली, त्यानंतर शिंदे यांनी तातडीने सकाळी एक पथक विवाहस्थळी पाठवून  मुलीच्या वयाची खातरजमा केली व मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मुला मुलीचे आई-वडील  यांना बारामती शहर पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले. अल्पवयीन विवाह बाबत होणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहिती दिली, शिवाय अल्पवयीन बालविवाह केल्यामुळे मुला-मुलींच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबाबत जागृतीही केल्याने हा विवाह दोन्ही परिवारांकडून थांबवण्यात आला. बारामती शहर पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय यांच्यावतीने प्रतिबंधात्मक कारवाई  करून दोन्ही परिवारांना सोडण्यात आले आहे.

पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, वडगावशेरी, धानोरी भागात मिळणार पुरेसे पाणी कारण..

आपण २१ व्या शतकात वावरत असताना अजूनही काही समाजात जुन्या चालीरीती, रूढी परंपरा सुरू आहे याबाबत खंत वाटते. यापुढे बालविवाह जात पंचायत यासारख्या घटना बारामती तालुक्यात खपवून घेतल्या जाणार नाहीत, तसेच अशा घटनांना जे बाहेरून खत-पाणी घालत आहेत त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.-नामदेव शिंदे, पोलिस निरीक्षक बारामती शहर पोलिस स्टेशन

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child marriage stopped by police in Dorlewadi