मुलांना गवसलाय रागदारी संगीताचा आनंद (व्हिडिओ)

नीला शर्मा
रविवार, 28 एप्रिल 2019

अभिजातची वाढतेय गोडी  
दणादणाटापेक्षा शांत, सुरेल, सुमधुर संगीताची आवड सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. वेगवेगळ्या वाहिन्या व समाज माध्यमांतून शास्त्रीय संगीत गाणारी मुलं झळकतात, त्याचाही हा परिणाम असू शकतो. सुटीचा उपयोग करून मुलांमध्ये शास्त्रीय संगीताची अभिरुची निर्माण करण्यासाठी पालकही प्रयत्नशील असल्याचे चित्र असून, त्यामुळे खासगी गायनाच्या शिकवणुक्‍यांकडे ओढा लागला आहे.

पुणे - ती मुलं वेगवेगळ्या रागांमधील बंदिशी गातात. कर्कश आवाजातील गाणी किंवा ढॅण ढॅण वाजणाऱ्या वाद्यांच्या गोंगाटापेक्षा शांत असं रागदारी संगीत गायला त्या मुलांना खूप आवडतं.

‘‘रागदारी संगीत गाताना आणि ऐकताना खूप छान वाटतं. ते गाताना किंवा ऐकताना मनाची एकाग्रता वाढते. त्यामुळे अभ्यासातही जास्त एकाग्र होता येतं,’’ असं अनन्या आणि रिद्धिमा सांगत होत्या. सलोनी म्हणाली, ‘‘वेगवेगळे राग शिकताना काही तरी नवीन सापडतं.’’ पूर्वानं सांगितलं, की मी स्वतः एखादी बंदिश गाताना जेवढी मजा येते, तेवढीच दुसऱ्यांनी गायलेल्या बंदिशी ऐकतानासुद्धा येते. 

अनय, जयदीप व प्रणव म्हणाले, ‘‘प्रत्येक रागासाठी वेगळी वेळ ठरलेली असते. जसं भूप सकाळी गातात. यमनची वेळ संध्याकाळची. पण हेच राग वेगळ्या वेळी गातानाही छान वाटण्यासाठी खूप तयारी पाहिजे. आम्हाला तसं जमलं पाहिजे.’’ पूर्वा, अर्चिता व शर्मदा यांनी सांगितलं, की आम्हाला शास्त्रीय संगीत शिकवणाऱ्या वृंदाताई बाम हार्मोनियमवर स्वर वाजवून विचारतात, की हा कुठला राग आहे ते ओळखा. आमच्यापैकी कुणीही ओळखलं की त्या लगेच विचारतात, ‘हे कशावरून ओळखलं?’ आम्ही सांगतो, ‘‘अमुक स्वरांवरून किंवा कुठले स्वर लागले नाहीत त्यावरून.’’ आमचं बरोबर निघालं की फार मस्त वाटतं. 

वृंदाताईंच्या स्वरतरंग संगीत विद्यालयात या मुलांपैकी कुणाला पाच-सहा वर्षे झाली आहेत, तर कुणी गेल्या वर्षी येऊ लागलं. एक मात्र नक्की, की या मंडळींची भारतीय अभिजात संगीताशी छान गट्टी जमली आहे. 

म्हणून तर उन्हाळ्याच्या सुटीत गाण्याच्या क्‍लासलाही सुटी असली तरी हे बालगायक गाणं सुरूच ठेवतात. आई-बाबांना, आजी-आजोबांना श्रोता म्हणून समोर बसवून यांच्या छोट्या मैफली घरात किंवा नातेवाइकांकडे रंगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Music Song Enjoy