Video : गच्चीवर बहरते मुलांची कलाकारी

इंदोरी (ता. मावळ) - गच्चीवरील फुले व भाजीपाल्याच्या कुंड्या रंगवण्यात रंगलेली बच्चेकंपनी.
इंदोरी (ता. मावळ) - गच्चीवरील फुले व भाजीपाल्याच्या कुंड्या रंगवण्यात रंगलेली बच्चेकंपनी.

मावळ तालुक्‍यातील इंदोरी गावात राहणारी, एकाच कुटुंबातील चार मुलं वेगवेगळ्या कामातून आनंद मिळवतात. त्यांची कल्पकता, नावीन्याचा ध्यास व चिकाटी पाहून मोठ्या माणसांचाही उत्साह वाढतो. खुशी, विश्‍वा, सुमेध आणि साक्षी यांची कलाकारी सध्या त्यांच्या घराच्या गच्चीवर बहरते आहे. 

सकाळी पटपट उठून खुशी, विश्‍वा, सुमेध आणि साक्षी घराच्या गच्चीवर जातात. तिथं फुलं व भाजीपाल्याच्या कुंड्या या चौघांची वाट बघत असतात. हे चौघे या लाडक्‍या कुंड्यांना भेटायला उत्सुक असतात. चाळीस कुंड्यांपैकी काहींमध्ये वाढलेली रोपं डोलत असतात. उरलेल्यांमध्ये कोणकोणती रोपं लावायची, त्याची चर्चा यांच्यात रंगत असते. सध्या ते कुंड्या रंगविण्यात रंगलेले आहेत. या भरात कुणी तरी स्वतःला नकळतपणे रंगवून घेतलं आहे आणि त्याच्यावरून चेष्टा, विनोद चाललेले आहेत. कुंड्यांवर पानं, फुलं, प्राणी, पक्षी रंगवायची योजना आहे. 

तिसरीतला विश्‍वा म्हणाला, ‘आम्ही सकाळी आणि संध्याकाळी ऊन कमी असताना गच्चीतल्या कुंड्या रंगवायला बसतो. किती रंगवून झाल्या ते रोज मोजायला मला आवडतं. पण अजून तर थोड्याच झाल्यात, बाकी कधी पूर्ण होतील, असा प्रश्‍न पडतो.’’ साक्षी त्याला कुंड्या मोजायला मदत करते. काळजी करू नको, असं सांगते. खुशीसुद्धा त्याची उमेद वाढवते. 

नववीतला सुमेध म्हणाला, ‘‘आमच्या जवळच भंडारा डोंगर आहे. सकाळी रोज त्याला मी प्रदक्षिणा घालतो. पाच-सहा किलोमीटरचं हे अंतर आहे. ‘नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली साक्षी सांगते, ‘‘आमच्या जवळपास भरपूर शेती आहे. ऊस, भात अन्‌ भाजीपाला तिथं होतो. आम्हाला हिरवाईचा मस्त शेजार मिळाला आहे.’’ सहावीतली खुशी म्हणाली, ‘‘आम्ही थोडासा मोकळा वेळ मिळाला तरी काही तरी नवीन शोधून काढतो. मोठी सुटी मिळायच्या आधी आमच्याकडे काय-काय मज्जा करायची आहे, त्याची यादी तयार असते. नवं काम करून पाहायला मजा वाटते.’’सारिका जयंत राऊत यांनी स्पष्ट केलं की, सुमेध आणि साक्षी ही माझी मुलं. खुशी आणि विश्‍वा ही माझ्या जावेची (शीतल योगेश राऊत) मुलं. हे चौघे मिळून वेगवेगळ्या कल्पना लढवतात.

यांना मौज तर अनुभवता येईल, पण त्यातून एखादं कामही पार पडेल, असं बरेचदा ते ठरवतात. आमच्या एकत्र कुटुंबात आम्ही सगळेच मिळून मिसळून कामं करतो, तो वारसा ही मुलं जपत आहेत. माझ्या सासूबाई (सुनंदा सूर्यकांत राऊत) गावच्या सरपंच होत्या. त्यांना जिल्हास्तरीय आदर्श सरपंच हा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्याकडून पूर्वजांच्या आणि गावांबद्दलच्या जुन्या गोष्टी ऐकायला मुलांना आणि आम्हालाही खूप आवडतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com