मुलाला शिक्षणासाठी पाठवले आणि वाहनचोर झाला 

मुलाला शिक्षणासाठी पाठवले आणि वाहनचोर झाला 

पिंपरी - लोकांच्या शेतांत ऊसतोड करून मुलाला नर्सिंगच्या शिक्षणासाठी 40 हजार रुपये दिले. वाटलं, शिक्षण घेतल्यावर त्याला मोठ्या पगाराची नोकरी लागेल. मात्र, तो वाहनचोर निघाला. त्याने आमची स्वप्नं मातीमोल केली, असा टाहो ती माता निगडी पोलिस ठाण्यात फोडत होती. 

संभाजी किसन घाडगे (वय 21, सध्या रा. देहू, मूळ गौरवाडी, ता. केज, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने पिंपरी- चिंचवड आणि आसपासच्या परिसरातून 20 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 18 दुचाकी हस्तगत केल्या असून, उर्वरित दोन दुचाकी सोलापूर येथे आहेत. 

बारावीपर्यंत शिकलेला संभाजी हा शहरातील रुग्णालयामध्ये वॉर्डबॉयचे काम करायचा. नर्सिंगचे शिक्षण घेतल्यावर चांगल्या पगाराची नोकरी लागेल, असे त्याने आई-वडिलांना सांगितले. शिरूरमध्ये झोपडीत राहणाऱ्या त्याच्या आई-वडिलांनी कष्ट करून कमावलेले 40 हजार रुपये त्याला दिले. मात्र, संभाजीला वाहन चोरीप्रकरणी अटक केल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. खात्री करायला ते पोलिस ठाण्यात आले. मुलाला बेड्या घातलेल्या पाहून त्यांना रडू आवरले नाही. त्यांनी आपली कैफियत अधिकाऱ्यांसमोर मांडली. मुलाला चांगली नोकरी लागल्यास आपल्याला कष्टाची कामे करावी लागणार नाहीत, असे आम्हाला वाटले होते. मात्र, त्याने आमच्या स्वप्नांचा चुराडा केला. 

अशी होती चोरीची पद्धत 
वाहनचोरीसाठी तो चोरीचे वाहन वापरत असे. पार्किंगमधून चोरलेली दुचाकी घेऊन येत असे व तेथील नवी कोरी दुचाकी लॉक तोडून चोरून नेत असे. त्यानंतर काही वेळाने येऊन सोबत आणलेली दुचाकी परत घेऊन जात असे. 

मैत्रिणीवर उधळला पैसा 
शहरात आल्यावर त्याने दोन तरुणींशी मैत्री केली. चोरीची वाहने विकून आलेल्या पैशांतून तो चांगले कपडे घेत असे. तसेच, मैत्रिणींसोबत फिरताना त्यांच्यावर खर्च करीत असे. मात्र, यापैकी एकही पैसा त्याने घरी दिला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com