Video : मुलांनी अनुभवली आधुनिक रूपातील दहीहंडी

चिमुकला निषाद (मध्यभागी)  हंडीतील खाऊ आई, देवश्रीच्या मदतीने काढायच्या तयारीत. (डावीकडे) वीर आणि प्राची खाऊच्या प्रतीक्षेत.
चिमुकला निषाद (मध्यभागी) हंडीतील खाऊ आई, देवश्रीच्या मदतीने काढायच्या तयारीत. (डावीकडे) वीर आणि प्राची खाऊच्या प्रतीक्षेत.

पुणे - निषाद या चिमुकल्याने शेजारी राहणाऱ्या वीर व प्राची या मित्रमैत्रिणींबरोबर रविवारी (ता. ९) दुपारी खाऊहंडी लुटण्याची मौज अनुभवली. पारंपरिक दहीहंडीच्या प्रथेत काळानुरूप बदल करण्याची गरज निषादची आई, देवश्री वैद्य हिने याप्रसंगी मुलांना समजावून दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येत्या मंगळवारी श्रीकृष्ण जयंती व बुधवारी गोपाळकाला साजरा करण्याची तयारी अनेक मराठमोळ्या घरांमध्ये सध्या सुरू आहे. दरवर्षी या निमित्ताने होणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी शाळकरी मुलंही उत्सुक असतात.

देवश्री म्हणाली, ‘‘शाळांमध्ये मुलांना सोयीच्या ठरणाऱ्या एक - दोन दिवसांआधीही दहीहंडी साजरी केली जाते. यंदा अजून शाळा भरलेल्या नाहीत. बच्चेकंपनी घरीच अभ्यास करत आहेत. हे लक्षात घेऊन आम्ही निषादला शेजारच्या मुलांबरोबर पुरेसा वेळ मजेत घालवता यावा, या दृष्टिकोनातून रविवार सुट्टीची दुपार यासाठी निवडली. मातीची एक छोटी हंडी मस्त सजवली. तिच्यावर झाडाची पानं व शोभेच्या वस्तू चिकटवल्या. घरातच, मुलांचे हात पोहोचतील, एवढ्या उंचीवर ती लटकवली.’’

देवश्रीने असंही सांगितलं की, बाजूला फळ्यावर काढलेलं चित्र मुलं पाहत होती. त्यात गोपाळकृष्ण मित्राच्या पाठीवर उभा राहायचा प्रयत्न करतो आहे. दहीहंडीला त्याचे हात लागलेले आहेत आणि दोन बाजूंना उभे सवंगडी उत्सुकतेने बघत आहेत, असं दाखवलं होतं. या बालगोपाळांना सांगितलं की, ही हंडी फोडण्याऐवजी आपण नंतर ती वेगवेगळ्या कामांसाठी वापरूया.

त्यामुळे मुलांनी अलगद तिच्यातील खाऊ लुटला. लाह्या, फुटाणे, सुकामेवा आणि चॉकलेट हातात येताच मुलांनी जल्लोश केला. काळानुरूप केलेल्या या बदलांमुळे जुनी परंपरा नव्या स्वरूपात साजरी करायचा आनंद घेतला. हंडी फोडण्याऐवजी तिचा फेरवापर करायची कल्पना मुलांपर्यंत पोचवता आली. पौष्टिक खाऊ कोणता आणि तो खाल्ल्याने तंदुरुस्त कसं राहता येतं, हेही त्यांना समजावून सांगितलं. नंतर दिलेला गोपाळकालाही त्यांनी मजेत संपवला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com