मुलांना ‘इंटरनेट ॲडिक्‍शन’चा विळखा!

पांडुरंग सरोदे 
सोमवार, 29 जुलै 2019

असे आहेत दुष्परिणाम 
  नेहमीच्या सवयींमध्ये अचानक बदल होणे
  चिडचिड निर्माण होऊन राग अनावर होणे
  वाचन, अभ्यासाकडे दुर्लक्ष होणे
  तरुणांमध्ये निद्रानाशाचे वाढते प्रमाण 

पुणे - शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुणांमध्ये वाढत्या मोबाईल, इंटरनेटच्या अतिवापरामुळे इंटरनेटचे व्यसन (इंटरनेट ॲडिक्‍शन) निर्माण झाले आहे. अमली पदार्थांच्या व्यसनाइतकेच इंटरनेटचे व्यसन धोकादायक बनत असून, किशोरवयीन मुले व तरुण त्याच्या आहारी जात आहेत. परिणामी, त्यांच्यावर मानसिक विकाराचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र आहे.

दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात मोबाईल, इंटरनेटचा वापर होतो. दैनंदिन काम किंवा करमणुकीसाठीचा अपवाद वगळता कुटुंबातील मोठ्या व्यक्तींकडून मोबाईल, इंटरनेटचा वापर करणे टाळले जाते. परंतु, कुटुंबांमधील किशोरवयीन मुले व तरुणांकडून मात्र मोबाईल, इंटरनेटचा सतत वापर होत असल्याचे चित्र दिसते. अशा स्वरूपाच्या तंत्रज्ञानाच्या सातत्याने संपर्कात राहिल्याने त्यामुळे मानसिक विकार निर्माण होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

मुले रात्रंदिवस मोबाईल, लॅपटॉप, संगणकाच्या पडद्याकडे नजर लावून बसल्याची दिसतात. हे त्यांच्यात इंटरनेटचे व्यसन वाढत असल्याचे लक्षण आहे. यामुळे इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर (आयजीडी), इंटरनेट ॲडिक्‍शन डिसऑर्डर (आयएडी), फेसबुक ॲडिक्‍शन डिसऑर्डर (एफएडी), सोशल मीडिया ॲडिक्‍शन (एसएमए), फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम (पीव्हीएस) वाढत आहेत.

वाढत्या इंटरनेट व्यसनाबाबत मानसोपचारतज्ज्ञांकडून चिंता व्यक्त होत आहे. दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) ‘बिहेविरीअल ॲडिक्‍शन क्‍लिनिक’मध्ये ‘इंटरनेट ॲडिक्‍शन’च्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण  सर्वाधिक आहे.

असे आहेत दुष्परिणाम 
  नेहमीच्या सवयींमध्ये अचानक बदल होणे
  चिडचिड निर्माण होऊन राग अनावर होणे
  वाचन, अभ्यासाकडे दुर्लक्ष होणे
  तरुणांमध्ये निद्रानाशाचे वाढते प्रमाण 

अशी घ्या काळजी  
  विविध प्रकारच्या नैसर्गिक खेळांची रुची निर्माण करा
  मुलांशी अधिकाधिक वेळ बोलण्यास, समजून घेण्यास प्राधान्य द्या
  मोबाईल व इंटरनेट वापरावर मर्यादा आणा
  मुलांच्या मोबाईल वापरावर बारकाईने लक्ष ठेवणे

मानसोपचारतज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेस ‘इंटरनेट ॲडिक्‍शन’ हे अमली पदार्थांइतकेच धोकायदायक असल्याचे सांगितले आहे.
- सुनील गौडा, मानसोपचारतज्ज्ञ

इंटरनेटचा वापर करून तरुण कित्येक तास मोबाईल, लॅपटॉपकडे डोळे लावून बसतात. हे चित्र शहरांमध्ये नाही, तर ग्रामीण भागातही आढळते.
- योगेश ठाणगे, सायबरतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children Internet Addiction