स्थलांतरीत कामगारांची मुले अद्यापही शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर

The children of migrant workers are still far from education
The children of migrant workers are still far from education

पुणे : एका ठिकाणाहून आपल्या मूळ गावी परतलेले किंवा कामाच्या शोधात अन्य ठिकाणी स्थलांतरित झालेल्या कामगारांची लाखो मुले सध्या शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत. या विद्यार्थ्यांचा अद्याप शाळेतील प्रवेश न झाल्याचे पडसाद शाळांमधील प्रवेश संख्येवर उमटले आहेत.

केवळ एका शहरातून, एका जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्या-राज्यातून कोरोनाच्या संकट काळात लाखो कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. हे स्थलांतर होत असताना, ते एक मजुरापुरते मर्यादित नव्हते, तर ते त्यांच्या कुटूंबियांचे देखील स्थलांतर होते. प्रत्येक कुटूंबात दोन-तीन मुले (शालेय विद्यार्थी) गृहित धरले, तरी ही संख्या काही लाखांच्या घरात जात आहे. हे विद्यार्थी आता कुठे आहेत. याचे उत्तर कोणाकडेच नाही. शासन दफ्तरी या विद्यार्थ्यांची अद्याप कोणतीही नोंद घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे विद्यार्थी गेल्या आठ महिन्यांपासून शाळाबाह्य असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक हेरंब कुलकर्णी म्हणाले, स्थलांतर होऊन बाहेरगावी किंवा मूळ गावी परतलेल्या कामगारांच्या मुलांचे अद्याप शाळेतील प्रवेश झालेले नसल्याचे दिसून येते. स्थलांतर करण्यापूर्वी शाळेत असलेली नोंद तशीच कायम आहे. परंतु या कामगारापर्यंत पोचणे अशक्‍य झाल्याने अनेकांची शिक्षण गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत.

ही मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली जाण्याची शक्‍यता निर्माण होत आहे. त्याशिवाय यातील विशेषत: विद्यार्थीनी शिक्षणापासून दुरावल्या गेल्यास बालविवाह होण्याचा धोका निर्माण होत आहे. या विद्यार्थ्यांची नोंद शाळेत न झाल्याने निश्‍चित शाळा प्रवेश यंदा कमी झाले आहेत. राज्यातील 100 टक्के ऊसतोड कामगारांची मुले ही सध्या तरी त्यांच्यासोबत आहेत. अशावेळी या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या शाळा प्रवेशासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात जवळपास 11 हजारांहून अधिक खाणी आहेत. यामध्ये १० ते १५ लाखांहून अधिक कामगार काम करतात. या कामगारांची 0 ते 18 वर्षे वयोगटातील जवळपास पाच ते दहा लाख मुले आहेत. या मुलांसाठी काम करणाऱ्या 'संतुलन संस्थे'चे प्रमुख ऍड. बस्तु रेगे म्हणाले, कोरोना काळात स्थलांतरीत झालेले मजूर  अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलांचा यंदा शाळा प्रवेश झालेला नाही.

दगडखाण कामगारांमधील 60 ते 70 टक्के कामगार अद्यापही संपर्कात नाहीत, त्यांच्याशी असणारा संपर्क पुर्णपणे तुटलेला आहे. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असण्याची शक्‍यता आहे. कारण त्यांना अन्य शाळेत प्रवेश घ्यायचा असता, तर त्यांनी संस्थेशी संपर्क साधला असता, हे निश्‍चित. पुण्यासह नाशिक, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील खाण कामगारांच्या जवळपास तीन ते साडेतीन हजार मुलांचा शाळेतील प्रवेश संस्थेच्या माध्यमातून होते. परंतु यंदा केवळ ४०० ते ४५० विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर आले आहे. 

अखिल भारतीय समाजवादी शिक्षक हक्क सभेचे उपाध्यक्ष शरद जावडेकर म्हणाले, विशेषकरून बालवाडी, इयत्ता पहिली आणि पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येवर परिणाम झाल्याचे निदर्शनास येते. वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्याने अनेक कामगार शहराकडे पुन्हा परतत आहेत. त्यामुळे डिसेंबर महिना सुरू झाला, तरीही शाळा प्रवेश अद्याप सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com