हम भी किसीसे कम नहीं; बोर्डाच्या परीक्षेत चमकली कष्टकऱ्यांची पोरं!

Students_SSC (Picture Credit- Google)
Students_SSC (Picture Credit- Google)

पुणे : आई शहरात कागद, काच, पत्रा उचलते, वडील मजूरी करतात. राहण्यासाठी एकच खोली आणि घरात चार पेक्षा जास्त माणसं. खासगी ट्यूशन लावण्याची परिस्थिती नाही. तरीही या कष्टकऱ्यांच्या मुलांनी त्यांची चमक इयत्ता 10वीच्या निकालात दाखवून दिली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कागद, काच, पत्रा, कष्टकरी संघटनेचे सुमारे 10 हजार सदस्य आहेत. शहर स्वच्छ करताना घरात लक्ष देऊ शकत नाहीत, पण परिस्थितीची जाणीव असल्याने त्यांची मुले स्वतःच्या हिंमतीवर शिक्षणात नवी नवी शिखरे गाठत आहेत. यंदा 95 मुलांनी 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यापैकी 8 जणांना 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, तर 16 जणांना 70 पेक्षा जास्त गुण आहेत. मुलांच्या या अशामुळे त्यांच्या आई-वडिलांना समाधान मिळाले आहे.

फुरसुंगी येथी रहाणारी पायल कसबे म्हणाली, "मला 84 टक्के पडले आहेत, माझे आई, वडील, आजी आजोबा, भाऊ, बहिण असे आम्ही सर्वजण एका खोलीत राहत आहोत. घरातील सर्वजण झोपले की, मी रात्री 11 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करत असे. पहाटे पाचला उठून परत वाचन करत. त्यानंतर घरातील कामे उरकून शाळेत जात. संध्याकाळी शाळेतून आले की, घरची कामे करावी लागत. त्यानंतर पुन्हा अभ्यास करत. मी खासगी शिकवणी लावली नव्हती. शाळेतून मला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले म्हणून हे यश प्राप्त झाले. पुढील शिक्षण विज्ञान शाखेतून घेणार आहे.''

सिंहगड रस्ता तुकाईनगर येथे राहणाऱ्या फुलचंद मगर यांचा मुलगा महेश याने 85 टक्‍के मिळवले आहेत. याबाद्दल फुलचंद मगर म्हणाले, "महेश कर्वेनगर येथील डी.आर. नगरकर प्रशालेत होता. आमच्या घरात कोणीच जास्त शिकलेले नाही, पण महेशने स्वतःहून अभ्यास करून चांगले गुण मिळवल्याने आनंद झाला आहे. 10वीला खासगी क्‍लास लावण्यासाठी मी तयार होतो, पण कशाला 30-40 हजार रुपये खर्च करता मी स्वत: अभ्यास करतो असे सांगितले होते. त्यानुसार त्याने यश मिळवले. पुढे त्याला ज्या विषयात शिक्षण घ्यायचे आहे, त्यात मी सहकार्य करणार. त्याला मागे पडू देणार नाही,'' असा भक्कम पाठिंबा फुलचंद यांनी महेशला दिला.

कागद, काच, पत्रा, कष्टकरी संघटनेच्या सदस्यांचे यशस्वी विद्यार्थी : तनुजा कांबळे 85.2 टक्के, महेश मगर 85 टक्के, पायल कसबे 84, ऋतुजा हेडगे 84, यास्मिन सय्यद 84, अंचल नाडे 84, आनंद गायकवाड 81.8, साक्षी नाईकनवरे 79, प्राची हटकर 77, साई जाधव 77, महक इनामदार 76, संध्या गायकवाड 76, निकीता पवार 75.8, गणेश संपांगे 75, पंचशील खावले 75, केतन असावरे 72.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com