चिंचवडची समीकरणे बदलली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

शिवसेनेकडून कारवाई केव्हा?
आता राज्यात सत्ता स्थापन्यावरून भाजप-शिवसेनेची युती तुटली आहे. त्यामुळे बारणे काय भूमिका घेतात, हे बघावे लागेल. विशेष म्हणजे कलाटे यांनी बंडखोरी करून जगतापांविरोधात लढत देऊन शिवसेनेने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही, यावरून चिंचवडमधील राजकारणाची बदलती समीकरणे लक्षात येतात.

पिंपरी - गेल्या दहा वर्षांपासून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राजकारण लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे या दोन नावांभोवतीच फिरत आहे. त्यात आता राहुल कलाटे या नव्या चेहऱ्याची भर पडली आहे. या तिघांमधील राजकीय वादविवाद, आरोप-प्रत्यारोप सर्वश्रुत आहे. मात्र, निवडणूक निकाल आणि सत्ता स्थापनेसाठी बनत असलेली आघाडी यामुळे मतदारसंघातील राजकीय चित्र वेगाने बदलणार आहे. तसेच पाच वर्षांपूर्वीपर्यंत शहरावर एक हाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही बळ मिळाले आहे. 

हवेली व मुळशी या मतदारसंघांचे विभाजन करून २००८ मध्ये चिंचवडची निर्मिती झाली. तेव्हापासून आतापर्यंत दोन वेळा विधानसभेचे नेतृत्व आमदार जगताप करत आहेत. आता सलग तिसऱ्यांदा ते निवडून आले आहेत. २००९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून शिवसेनेच्या बारणे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीपासून दोघांमध्ये तेढ निर्माण झाली. बारणे यांनी याचे उट्टे लोकसभा निवडणुकीत जगताप यांचा पराभव करून काढले. तेव्हापासून दोघांमध्ये राजकीय शत्रुत्व वाढले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही ते कायम होते. 

२०१४ मध्ये जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या विरोधात शिवसेनेचा नवा चेहरा असलेले राहुल कलाटे लढले. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नाना काटे व काँग्रेसचे भाऊसाहेब भोईरही तोडीसतोड होते. मात्र, कलाटे यांनी गेल्या पाच वर्षांत जनसंपर्क वाढविला. विधानसभा निवडणुकीची तयारी केली आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जगतापांना मोठी लढत दिली. लाखांवर मते घेऊन ‘एकतर्फी निवडणूक जिंकू’ हे जगतापांचे स्वप्न धुळीस मिळविले. 

विशेष म्हणजे या वेळी बारणे जगतापांच्या व्यासपीठावर होते. कारण, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘हो, नाही’ करता करता जगतापांचे सहकार्य मिळाले. चिंचवडमधून सर्वाधिक मते मिळाली. त्याची परतफेड करण्याची वेळ आता बारणेंवर होती. त्यामुळे विधानसभेच्या लढतीत गेल्या दहा-वर्षांचे राजकीय शत्रुत्व विसरून बारणे जगतापांच्या व्यासपीठावर जाऊ लागले. ‘केवळ, भाऊंचे (जगताप) मताधिक्‍य किती इतकेच बघायचे आहे,’ हे त्यांचे रहाटणीतील मुख्यमंत्र्यांच्या सभेतील वक्तव्य होते. मात्र, २०१४ पेक्षा जगतापांचे मताधिक्‍य घटले आणि कलाटे यांच्या रूपाने नवा राजकीय विरोधक निर्माण झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinchwad constituency politics