चीनचा प्रवासी पुण्यातील रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

विमानात असलेल्या चिनी प्रवाशाला सध्या कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, त्यामुळे तो अद्यापही संशयित रुग्ण आहे. त्याची वैद्यकीय चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यास विमानात त्याच्याजवळ असलेल्या प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवले जाईल. याला ‘काँटॅक्‍ट स्क्रिनिंग’ म्हटले जाते.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, महापालिका

पुणे - भारतात दहा दिवसांपूर्वी आलेल्या एका चिनी नागरिकाला कोरोना विषाणूंची लक्षणे दिसल्याने पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात शुक्रवारी ठेवण्यात आले. ली सियोन असे त्याचे नाव असून, दिल्ली येथून पुण्याकडे येणाऱ्या विमानाने तो प्रवास करत होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीहून १७७ प्रवाशांना घेऊन पुण्याकडे जाण्यासाठी विमानाने सकाळी उड्डाण केले, त्या वेळी ली सियोनला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याला उलट्या झाल्या. तो चीनचा नागरिक असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन पुणे विमानतळावर उतरल्यानंतर त्याला तातडीने डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. याबाबत महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, ‘‘ली सियोनला विमानात त्रास झाल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले असून, अहवाल शनिवारपर्यंत (ता. ८) मिळेल. त्यानंतरच त्याला नेमके काय झाले, हे स्पष्ट होईल.’

‘कोरोना’वर आता कोण ठेवणार लक्ष पहा

ली सियोन हा दहा दिवसांपूर्वी चीनमधून भारतात आला आहे. यादरम्यान तो कोलकता, भुवनेश्वर, दिल्ली या शहरांमधून फिरून आता पुणे येथे उतरला असल्याची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. 

पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली चालायचे सेक्स रॅकेट; पोलिसांचा छापा

पुण्यात एकही रुग्ण नाही
डॉ. नायडू रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात सात खाटा कोरोना विषाणूंच्या संसर्गासाठी राखीव ठेवल्या आहेत. पुण्यात आतापर्यंत दाखल केलेल्या नऊ रुग्णांचे दोन्ही नमुने ‘निगेटिव्ह’ आले आहेत, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडले. कोरोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या भागातून प्रवास करून आलेल्या दोन प्रवाशांना गुरुवारी (ता. ६) संध्याकाळी डॉ. नायडू रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल केले. त्यानंतर शुक्रवारी (ता. ७) सकाळी चीनच्या नागरिकाला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर दाखल केले, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese traveler admitted to hospital in Pune