पिंपरी - चिंतामणी रात्र प्रशाला आर्थिक संकटात  

अवधूत कुलकर्णी 
गुरुवार, 28 जून 2018

पिंपरी : मी सकाळी सहा ते आठपर्यंत घरोघरी दुधाच्या पिशव्या टाकतो. त्यानंतर साडेआठ ते दुपारी दोनपर्यंत एका कंपनीत नोकरी करतो. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत शाळेत येतो. चिंचवड स्टेशन येथील चिंतामणी रात्रप्रशालेतील अमर भूल हा दहावीतील विद्यार्थी त्याची हिकिकत सांगत होता. 

पिंपरी : मी सकाळी सहा ते आठपर्यंत घरोघरी दुधाच्या पिशव्या टाकतो. त्यानंतर साडेआठ ते दुपारी दोनपर्यंत एका कंपनीत नोकरी करतो. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत शाळेत येतो. चिंचवड स्टेशन येथील चिंतामणी रात्रप्रशालेतील अमर भूल हा दहावीतील विद्यार्थी त्याची हिकिकत सांगत होता. 

एकीकडे शहरात सुखवस्तू कुटुंबात राहणारे काही विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करताना दिसतात तर दुसरीकडे नोकरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावून शिकण्याची जिद्द बाळगणारे विद्यार्थी आढळतात. अमरची आई धुण्या-भांड्याची कामे करते तर वडील बिगारी काम करतात. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती जेमतेमच आहे. तरीही अमरमध्ये शिकण्याची जिद्द दिसली. त्यामागे त्याच्या आई-वडिलांची प्रेरणाही मोठी आहे. 

या विद्यार्थ्यासारखीच कमी-अधिक परिस्थिती असणारे सुमारे 250 ते 300 विद्यार्थी चिंतामणी रात्र प्रशालेत आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतात. या पैकी केवळ आठवीतील मुलांना महापालिकेकडून क्रमिक पुस्तके मोफत मिळतात. या शाळेत आठवी ते दहावीसाठी वर्षाला 250 रुपये तर अकरावी आणि बारावीसाठी अडीच हजार रुपये शुल्क आहे. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातूनच शिक्षकांच्या वेतनासह अन्य खर्च भागवावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना आई-वडील नाहीत. ते त्यांच्या मामा-मामी अगर काका-काकूकडे राहून शिक्षण घेत आहेत. हॉटेल, बेकरी, रुग्णालये, टेम्पो चालविणे, गवंडी, बिगारी, किराणा दुकानात नोकर यासारखी कामे करून विद्यार्थी शिकत आहेत. तळेगाव, लोणावळा, खंडाळा, कर्जत येथूनही विद्यार्थी येतात. 

शाळेला नुकतेच निगडी इनरव्हील क्‍लबने चार संगणक भेट दिले आहेत. परंतु संगणक लॅब सुरू करण्यासाठी शाळेला आणखी किमान आठ संगणकांची गरज आहे. विद्यार्थ्यांना चांगली रोजगारसंधी मिळावी, म्हणून "टॅली' सारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा शाळा व्यवस्थापनाचा मानस आहे. 

शाळेच्या शुल्कवाढीला मर्यादा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वह्या, पुस्तकांच्या खर्चासह संगणक लॅब यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सतरंजी, चटयांचीही शाळेला गरज आहे. भविष्यात फेटे बांधणे, जिम मार्गदर्शक, योगा प्रशिक्षण यासारखे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे.
- सतीश वाघमारे, मुख्याध्यापक, चिंतामणी रात्र प्रशाला, चिंचवडस्टेशन 

मी 2006 मध्ये दहावीत होते. परंतु आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी यंदा दहावी उत्तीर्ण झाले. याच शाळेत अकरावी (वाणिज्य) शाखेला प्रवेश घेतला आहे. पुढे आणखी शिकण्याची इच्छा आहे.
- आशा अवटे, रा. चिंचवडस्टेशन 

Web Title: chintamani night school in face financial crisis