आता ‘चौकीदार’ होणार पोलिसांचे खबरी

Police
Police

पुणे - शहरात घडणाऱ्या घटनांची वेळेत खडानखडा माहिती मिळावी, यासाठी आता पोलिसांनी ‘चौकीदारां’ना खबरे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ७ हजार खासगी सुरक्षारक्षकांचे नेटवर्क तयार केले आहे. सुरक्षारक्षकांच्या बैठका, व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून पोलिस ठाण्यांच्या पातळीवरून त्यांच्याशी समन्वय साधला जात आहे. 

पुणे पोलिस दलात अधिकारी, कर्मचारी असे मिळून सुमारे १० हजार पोलिस आहेत. पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असली, तरी पोलिसांची संख्या मात्र मर्यादित आहे. त्याचा ताण पोलिसांवर येत आहे. पूर्वी पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क जबरदस्त होते, पण आता ते वैयक्तिक स्तरावरच आहे. त्यामुळे बरेचदा पोलिस ठाणे, चौकीच्या शेजारी एखादी घटना घडली, तरी ती कळण्यास पोलिसांना उशीर होत आहे. 

पोलिसांचा विस्कळीत झालेला खबऱ्यांचा संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ‘पोलिस प्रायव्हेट सिक्‍युरिटी पार्टनरशीप’ (पी फोर) ही संकल्पाना पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मांडली आहे. पुण्यातून नुकतेच बदली झालेले अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी या योजनेचा आराखडा तयार केला आहे. कंपन्या, कार्यालये, सोसायट्यांचे सुरक्षारक्षक हे एका मर्यादित भागासाठी पोलिसांसारखेच काम करीत असतात, कोणत्याही घटनेकडे ते सतर्कतेच्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यांच्या कौशल्याचा वापर शहराच्या सुरक्षेसाठी करून घेता येऊ शकतो.

त्यासाठी खासगी चौकीदारांना ‘पी फोर’ योजनेतून पोलिसांशी जोडण्यात आले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातील गुन्हे पोलिस निरीक्षकांवर योजनेचे समन्वयकाची जबाबदारी आहे. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सुरक्षारक्षकांची बैठक घेतली जात आहे. त्यांचा व्हॉट्‌सॲप ग्रुप करून त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. त्याचा उपयोग गुन्ह्याच्या तपासासाठीही होत आहे.

शहरात घडणाऱ्या घटनांची माहिती पोलिसांना लगेच द्यावी, यासाठी अधिकाऱ्यांचे, पोलिस ठाण्यांचे नंबर आम्हाला दिले आहेत. सुरक्षारक्षकांचा व्हॉट्‌सॲप ग्रुप केला आहे. बैठकीमध्ये सुरक्षारक्षकांनी काम करताना काय खबरदारी घ्यावी, याच्या सूचना दिल्या आहेत.’’
- मानसिंग सुबळकर, रायन सिक्‍युरिटी सोल्यूशन, बिबवेवाडी 

२३ - सुरक्षारक्षकांचे व्हॉट्‌सॲप ग्रुप
२७४ - एजन्सीचे प्रमुख पोलिसांशी संलग्न
६,९९० - सुरक्षारक्षकांची नोंदणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com