अवैध दारू विक्री प्रकरणी ताब्यात घेतलेल्या नागरिकांच्या मृत्यूबाबत सीआयडी चौकशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पुणे : अवैध दारू विक्री प्रकरणी सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका नागरिकांच्या मृत्यूबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) चौकशी सुरु केली आहे. 

पुणे : अवैध दारू विक्री प्रकरणी सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका नागरिकांच्या मृत्यूबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) चौकशी सुरु केली आहे. सीआयडीच्या पथकाने सोमवारीच पोलिस ठाण्यामध्ये संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यास सुरवात केली. 

सोपान मधुकर देवकर (वय 60, रा. आंबेगाव खुर्द) असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. सिंहगड पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली होती. त्यावेळी देवकर यास 10 एप्रिलला अवैध दारु विक्रीप्रकरणी ताब्यात घेतले होते. दुसऱ्या दिवशी पोलिस कोठडीमध्ये देवकरला फिट आल्याने उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच रविवारी मध्यरात्री देवकरचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयामध्ये अहवाल सादर केला. 

देवकरला दारुचे व्यसन असल्याने त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. त्यातच अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु असताना त्यास ह्दयविकाराचा झटका आला. त्यामध्येच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. याप्रकरणी देवकरच्या नातेवाईकांनी आत्तापर्यंत पोलिसांविरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार दिली नाही. मात्र सध्या या प्रकरणाची "सीआयडी' मार्फत चौकशी सुरू असून त्यानंतर पुढील कारवाई होईल, असे सिंहगड पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 
 

Web Title: CID inquiry against the death of civilians taken in illegal liquor sale case