पालघर हत्याकांड प्रकरण: ‘सीआयडी’ने १२६ आरोपींविरुद्ध केलं दोषारोपपत्र दाखल!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

संबंधित पथकाने पालघर, डहाणू परिसरात फिरून आरोपींच्या घराची झडती, संशयितांची चौकशी, मारहाणीसाठी वापरलेली शस्त्रे जप्त केली. त्यानंतर ९० दिवसांच्या आत या संवेदनशील प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

पुणे : पालघर जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात दोन साधुंसह तिघांच्या खून प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) डहाणू येथील न्यायालयात १२६ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या संवेदनशील प्रकरणाचा 'सीआयडी'ने वेळेत तपास पूर्ण करीत दोन वेगवेगळी दोषारोपपत्रे दाखल केली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथील वनविभागाच्या चौकीजवळ मुंबई येथून गुजरातकडे निघालेल्या दोन साधू आणि त्यांचा वाहनचालक अशा तिघांवर १६ एप्रिल रोजी गावात चोरटे शिरल्याच्या अफवेतून हल्ला झाला होता. आणि जमावाने लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत त्यांना ठार केले होते. दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास पालघर पोलिसांकडून काढून तो सीआयडीकडे देण्यात आला होता.

अति तिथं माती! पैशांच्या हव्यासापोटी सराईत गुन्हेगाराला गमवावा लागला जीव!​

'सीआयडी'चे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पथकाच्या प्रमुखपदी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांची नेमणूक करण्यात आली होती. सीआयडीच्या कोकण भवन कार्यालयातील पोलिस अधिक्षक मारुती जगताप, पोलिस अधिक्षक अजय देवरे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. 

इकडं जामीन मंजूर झाला, अन् तिकडं त्याला कोरोना झाला!​

संबंधित पथकाने पालघर, डहाणू परिसरात फिरून आरोपींच्या घराची झडती, संशयितांची चौकशी, मारहाणीसाठी वापरलेली शस्त्रे जप्त केली. त्यानंतर ९० दिवसांच्या आत या संवेदनशील प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कासा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पहिल्या 
प्रकरणात तपास अधिकारी उपअधीक्षक विजय पवार यांनी तर दुसऱ्या गुन्ह्यात तपास अधिकारी इरफान शेख यांनी १२६ आरोपींविरुद्ध डहाणू येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CID Maharashtra files chargesheet in Palghar lynching case