अति तिथं माती! पैशांच्या हव्यासापोटी सराईत गुन्हेगाराला गमवावा लागला जीव!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

शेखने पडवळचा खून करण्यासाठी कासवेकर आणि उबाळे या दोघांना दहा लाख रूपये देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार नऊ जुलै रोजी रात्री नऊ वाजता तिघेजण पडवळच्या घरी गेले.

पुणे : व्यावसायिकास व्याजाने दिलेल्या 50 लाखांपोटी तब्बल दोन कोटी रुपये वसूल करूनही त्याच्याकडे आणखी 80 लाखाची मागणी केली. आणि हीच मागणी त्याच्या जीवावर बेतली. व्यावसायिकाने दोघांच्या मदतीने कोंढव्यातील सराईत गुन्हेगार घनशाम पडवळचा खून केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतर पडवळच्या खुनाचा उलगडा झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लतिफ अबू शेख (वय ४३, रा. पारगेनगर, कोंढवा), शुभम प्रमोद कासवेकर (वय- २४) आणि शुभम संतोष उबाळे (वय २२ दोघेही रा. नागपूर चाळ, येरवडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रघुनाथ उर्फ पप्पू पडवळ असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

इकडं जामीन मंजूर झाला, अन् तिकडं त्याला कोरोना झाला!​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतिफ शेख हा स्क्रॅप व्यावसायिक आहे. पप्पू पडवळ हा व्याजाने पैसे देत होता. शेख याने पडवळ याच्याकडून २० टक्के व्याजाने ५० लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्याने त्याची सदनिका आणि कागदपत्रे पडवळकडे गहाण ठेवली होती. घेतलेले कर्ज परत करण्यासाठी लतिफ याने त्याच्याकडील मालमत्ता विक्री करून दोन कोटी रूपये पडवळ यास दिले होते. तरीही पडवळ त्याच्याकडे आणखी ८० लाख रूपये मागत होता. पैसे नसतील तर सदनिका नावावर करून देण्यासाठी पडवळने तगादा लावला होता. याबरोबरच शेख याच्या कुटुंबातील महिलांबद्दल तो अपशब्द वापरत असे, तसेच पैसे न दिल्यास खून करण्याची धमकी देत असल्यानेच त्याचा खून केल्याची कबुली लतिफने दिली. 

महाराष्ट्राला यावर्षीही महापुराचा धोका; श्रावणसरी बसरणारच नाहीत​

असा केला खून...असा घेतला शोध 

शेखने पडवळचा खून करण्यासाठी कासवेकर आणि उबाळे या दोघांना दहा लाख रूपये देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार नऊ जुलै रोजी रात्री नऊ वाजता तिघेजण पडवळच्या घरी गेले. त्यानंतर तिघांनी तीक्ष्ण हत्यारांनी पडवळवर वार करून त्याचा खून केला.

दरम्यान, संशयित आरोपींनी पडवळच्या घरातील सीसीटिव्ही डीव्हीआर चोरून नेला. सोसायटीतील सीसीटिव्ही नादुरूस्त असल्याने पोलिसांना शोधकार्यात अडचण येत होती. त्याचवेळी पोलिसांनी पडवळने व्याजाने पैसे दिलेल्या लोकांची यादी काढली. त्यामध्ये सर्वाधिक कर्ज लतिफ शेखने घेतलेले दिसले. त्यानुसार पोलिसांनी शेखकडे ९ जुलै रोजी त्याच्या ठावठिकाणाची माहिती घेतली. त्यावेळी तो गोंधळला आणि त्याने खून केल्याचे कबूल केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kondhwa criminal had to lose his life for the sake of money