परिस्थिती आणि मनःस्थिती आपल्याला घडवत असते - उज्ज्वल निकम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ujjwal Nikam

‘आत्मविश्‍वास ही यशाची गुरुकिल्ली नाही. परंतु, आत्मविश्‍वास हा आपल्याला जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. जय आणि पराजयाला जास्त महत्त्व न देता समोर आलेल्या संकटांचा सामना केला पाहिजे.

परिस्थिती आणि मनःस्थिती आपल्याला घडवत असते - उज्ज्वल निकम

पुणे - ‘आत्मविश्‍वास ही यशाची गुरुकिल्ली नाही. परंतु, आत्मविश्‍वास हा आपल्याला जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. जय आणि पराजयाला जास्त महत्त्व न देता समोर आलेल्या संकटांचा सामना केला पाहिजे. परिस्थिती आणि मनःस्थिती आपल्याला घडवत असते. त्यामुळे कोणतेही काम करीत असताना आपल्याला त्यातील उच्चांक गाठायचा आहे, या ध्येयाने काम करा,’ असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विद्यार्थ्यांना मंगळवारी दिला.

‘यिन समर युथ समिट २०२२’ च्या समारोप सत्रात निकम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अभिनेते अजय पूरकर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडीया आणि पुणे ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते.

विक्रम कुमार म्हणाले, ‘श्रम करण्याची तयारी असेल तर काहीच अशक्य नाही. चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना अनेकांनी खूप मोठे काम करून दाखवले आहे. त्याच संधी आपल्याला देखील आहेत. देशातील तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहचत आहे. सर्व गोष्टी आपल्याला मोबाईलवर उपलब्ध आहे. त्याचा चांगला फायदा घेता आला पाहिजे. मानत जी इच्छा आहे, त्यावर लक्ष द्या आणि त्याबाबतचे शिक्षण घेऊन काम केले पाहिजे.’

पुरकर म्हणाले, ‘शिवरायांचे विचार पुढे जावे म्हणून आम्ही सिनेमाच्या माध्यमातून काम करीत आहे. व्हिज्युअल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक पातळीवर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पोचत आहेत. त्यांचे संस्कार घेऊन मुलं मोठी होतील, तेव्हा भारत बदललेला असेल. शिवाजी महाराजांची युद्ध नीती प्रत्येक भारतीयापर्यंत पोचविण्याचे आमचे प्रयत्न आहेत.’

डॉ. चोरडिया म्हणाले, ‘कोणत्याही लेक्चरमध्ये विद्यार्थी ४५ मिनिटेच लक्ष देऊ शकता, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र, यिनच्या कार्यक्रमात दोन दिवस विद्यार्थ्यांनी येथील बाबी समजून घेतल्या, त्याबद्दल त्याचे कौतुक. आपण आपला दिवस डिझाइन करीत नाही, तोपर्यंत कामाचे नियोजन योग्यपणे पार पडणार नाही. थेरीसह प्रॅक्टिकलचीही माहिती घ्या.’

समिट यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न केलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फडणीस यांनी केले तर भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

ॲड. निकम यांनी विद्यार्थ्यांना दिलेले सल्ले :

१) आत्मविश्वास संघर्ष करण्याची प्रेरणा देतो

२) जय आणि पराजयाला जास्त महत्त्व देऊ नका

३) हार न मानता संकटाचा सामना केला पाहिजे

४) परिस्थिती आणि मनःस्थिती आपल्याला घडवत असते

५) आपण काय करत आहोत, याचे मूल्यमापन केले तरच यश मिळेल

६) कुठे थांबायचे हे ठरवले व समजले पाहिजे

७) मार्गदर्शन मिळत नसल्याची ओरड करण्यापेक्षा स्वतः स्वतःचा गुरू बना

८) केवळ यश मिळण्यासाठीच प्रयत्न करू नका

९) उच्चांक गाठायचा आहे, या ध्येयाने काम करा

Web Title: Circumstances And Moods Shape Us Ujjwal Nikam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :pune
go to top